लोकसत्ता टीम
अमरावती : येथील पक्षी निरीक्षकांनी शहरालगत बोरगाव धरणावर सप्टेंबर महिन्यात उलटचोच तुतारी या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद केली असून सदर पक्ष्याचे सुस्पष्ट छायाचित्रही टिपण्यात आले आहे. हा पक्षी उन्हाळ्यात सायबेरिया आणि फिनलँड या त्यांच्या मूळ ठिकाणी विणीच्या हंगामाकरिता परत जात असताना उन्हाळ्याच्या सुरुवातीला मध्य भारतात काही ठिकाणी तात्पुरता थांबा घेतो. पण, हिवाळी स्थलांतरणाच्या सुरुवातीलाच अशी नोंद होणे ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.
अभिमन्यू आराध्य, प्रशांत निकम पाटील, वैभव दलाल आणि मनोज बिंड या पक्षी निरीक्षकांनी या पक्ष्याची महत्त्वपूर्ण नोंद केली आहे. उलटचोच तुतारी हा पक्षी भारतात मुख्यत्वे समुद्रकिनारपट्टीवर हिवाळी स्थलांतर करून येतो. झेनुस सिनारिअस असे शास्त्रीय नाव असलेल्या या चिखल पक्ष्याला टेरेक सँडपायपर असे इंग्रजी नामाभिधान आहे. उलटी म्हणजे खालून वरच्या बाजूने वाकत गेलेली याची तुतारीसारखी बाकदार निमुळती चोच या पक्ष्याचे वैशिष्ट्य असून त्यावरून याचे नाव पडले आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला भारतातील पूर्व, पश्चिम किनारपट्टी आणि अंदमान निकोबार येथे तो स्थलांतर करतो. भारतातून उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच परतीच्या प्रवासादरम्यान काही तुरळक नोंदी अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि यवतमाळ येथे यापूर्वी घेण्यात आल्या आहेत. मात्र, त्या सर्व नोंदी उन्हाळ्यातील आहेत.
आणखी वाचा-मोर पाऊस पडल्यानंतरच का नाचतो, माहिती आहे का?
गेल्या काही दशकांपासून जागतिक वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. विदर्भात सुद्धा यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असून तापमानात मोठी वाढ नोंदवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर या पक्ष्याचे नियोजित वेळेपूर्वीच विदर्भात आगमन होणे ही सामान्य बाब नाही, असे पक्षीनिरीक्षकांचे मत आहे. हिवाळ्याची सुरुवातही झालेली नसताना विदर्भास नियमित भेट देणाऱ्या छोटा चिखल्यासारख्या पक्ष्याचे आगमन झालेले दिसून आले. तसेच लाल पंखांचा चातक (चेस्टनट विंग ककू) हा पक्षी सुद्धा मेळघाट वगळता पहिल्यांदा तब्बल १० वर्षानंतर अमरावती शहरालगतच्या परिसरात याच महिन्यात आढळून आला.
तुतारी पक्ष्याची ही वैशिष्ट्यपूर्ण नोंद पक्षी-अभ्यास आणि निरीक्षणाकरिता इष्टापत्ती समजायची की जागतिक हवामानात होत चाललेल्या बदलाचे दुष्परिणाम, यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर ते एप्रिल-मे या संपूर्ण स्थलांतर कालावधीत याप्रकारच्या आणखी बऱ्याच अनपेक्षित व दुर्मिळ नोंदी विदर्भात होऊ शकतात. -वैभव दलाल, पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकार.