लोकसत्ता टीम
बुलढाणा : कडाक्याच्या थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याला निमित्त आहे ते ४८ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीचे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले.
येत्या २४ नोव्हेंबरला ही निवडणूक होऊ घातली आहे. नगरपरिषद, जिल्हापरिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा रणसंग्रामापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक महत्वाच्या ठरल्या. यात महाविकास आघाडी किंचित वरचढ ठरल्याने महायुतीला एक प्रकारे इशारा मिळाला. या पार्श्वभूमीवर ४८ उपसरपंचपदाची निवडणूक येत्या २४ तारखेला होऊ घातली आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुतेक ग्रामपंचायतमध्ये विजयी पॅनेलला बहुमत नाही, असे चित्र आहे. यामुळे फोडाफोडी, इतर गटाच्या सदस्याला आपल्याकडे वळविण्याच्या, बहुमताची जुळवाजुळव आदी हालचालींना वेग आला आहे.
आणखी वाचा-बुलढाणा : तिघांचे बळी घेणारा फरार ट्रॅव्हल्स चालक गजाआड; तीन दिवसानंतर अडकला जाळ्यात
सरपंच निर्णायक!
निवडणूक झालेल्या ४८ ग्रामपंचायतींची पहिली सभा व उपसरपंच निवड थेट सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. सरपंचांना ग्रामसचिव व तहसील कर्मचारी सहाय्य करणार आहे. सरपंचांना ‘व्हेटो पावर’ अर्थात एक जादाचे मत देण्याचा अधिकार आहे. अनेक ठिकाणी हे जादाचे मत निर्णायक ठरणार आहे.