नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे दोन मार्ग. एक म्हणजे, कठोर परिश्रम आणि दुसरा दृढनिश्चय. याच्या बळावर यंदा विदर्भासह नागपूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. नागपूरचे सर्वेश बावणे, प्रांजली खांडेकर, नम्रता ठाकरे, राहुल आत्राम, अपूर्व बालपांडे, सावी बलकुंदे, श्रीरंग कावरे, भाग्यश्री नैकाळे, सौरभ यावले या उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे.
यातील प्रत्येकाच्या यशाची स्वतंत्र अशी कथा आहे. परंतु, यातील सुविधा, संसाधने असतील तरच यश मिळते, हा समज नागपूरच्या भाग्यश्री नैकाळे या जिद्द मुलीने खोटा ठरविला. वडील इलेक्ट्रिशियनची कामे करतात. त्यामुळे तयारीसाठी महागड्या सुविधांसाठी आर्थिक पाठबळ नव्हतेच; पण भाग्यश्री यांनी हार न मानता स्वतःच तयारी करीत यूपीएससीच्या यशाला गवसणी घातली.
भाग्यश्री नयकाळे यांनी यूपीएससीमध्ये ७३७वी रँक प्राप्त केली आहे. ओबीसी प्रवर्गातून असल्याने आयपीएस किंवा आयआरएस मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. कुटुंबाला व विशेषतः आईला हा आनंदाचा क्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. वडील राजेश नयकाळे हे इलेक्ट्रिशियनची कामे करतात. करोनापूर्वी वडिलांना राजस्थानच्या जयपूर येथे इलेक्ट्रिक कामाचे कंत्राट मिळाले, तेव्हा कुटुंबाला सोबत जावे लागले. या काळात राजस्थानच्या महाविद्यालयातून बी.एस्सी पदवी पूर्ण केली. करोना काळात काम सुटल्याने कुटुंबाला नागपूरला परतावे लागले. असा खडतर प्रवास करून भाग्यश्रीने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.
असा आहे रेल्वेचा किस्सा
भारतीय प्रशासकीय पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने दिल्ली येथे मुख्य संयोजक डॉ. प्रमोद लाखे यांच्या नेतृत्वात दरवर्षी शिकवणी मुलाखती घेतल्या जातात. यासाठी भाग्यश्री नैकाळे यांनाही जायचे होते. जाताना रेल्वेचे तिकीट काढले. परंतु, आरक्षित जागा मिळाली नाही. त्यामुळे नागपूर ते झाशी आणि पुढे दिल्ली असा प्रवास करत त्यांना जावे लागले. यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च पडला. पुढे परत येतानाही आरक्षित तिकीट नव्हते. त्यामुळे डॉ. लाखे यांनी त्यांच्या टीमने त्यांना तिकीटासाठी मदत केली होती. असा खडतर प्रवास करत भाग्यश्री नैकाळे यांनी हे यश मिळवले आहे.
शिकवणीशिवाय यशाला गवसणी
देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएससीचा अभ्यास करायचा म्हटले की, विद्यार्थ्यांच्या ओढा हा दिल्लीकडे असतो. शिकवणीशिवाय यूपीएससी पास कशी होणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतो. पण, नागपूरच्या भाग्यश्री नैकाले यांनी यावर मात केली. भाग्यश्रीने कुठेही शिकवणी न घेता सलग तीन वर्षे अभ्यास करत यूपीएससी परीक्षेत ७३७ वी रँक मिळवली. अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे यश मिळावता आल्याने भाग्यश्री यांनी सांगितले. वडील कंत्राटी इलेक्ट्रिशन तर आई शिवणकाम करते. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही मुलीला आयएएस बनवण्याचे स्वप्न या कुटुंबाने बघितले आणि मुलीने ते पूर्ण केले. भाग्यश्री यांनी सांगितले, मला अभ्यास करताना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. माझ्याकडे कुठल्याही संगणक किंवा चैनीच्या सुविधा नव्हत्या. परंतु अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ही परीक्षा उत्तीर्ण केली.