नागपूर: राज्य सरकारच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षणाचे केंद्र जिल्हास्तरावर का करण्यात येऊ नये अशा सूचना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अशा उंचावल्या आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. त्यांनी नागपूर विभागातील सर्व सनदी अधिकाऱ्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी काही सूचना केल्या व माहिती जाणून घेतली. राज्य शासनाच्या प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच जिल्हास्तरावर केंद्र सुरू व्हावे तसेच, स्पर्धा परीक्षेच्या खाजगी वर्गांची जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी करून विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या.
दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत जे.पी. डांगे यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेचा टक्का वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असे सांगितले. विभागातील सनदी अधिकाऱ्यांकडून प्राप्त महत्त्वाच्या सूचना शासनापर्यंत पोहचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरचे संचालक डॉ. प्रमोद लाखे आदींची उपस्थिती होती.
सूचना काय?
बैठकीत सनदी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण केंद्र बळकट करण्याकरिता विविध उपाय सुचवले. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर जिल्हास्तरावरही असे केंद्र सुरू होऊन एक ते दोन महिन्याचे लघु अभ्यासक्रम सुरू व्हावे, अशी सूचना देण्यात आली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांचे सनदी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन व समुपदेशन करावे, स्पर्धा परीक्षेचे इंग्रजीत उपलब्ध साहित्य मराठीत अनुवादित व्हावे आदी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनण्याचा मनोदयही व्यक्त केला. नागपूरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवेसह अन्य सेवेमध्ये कार्यरत सनदी अधिकाऱ्यांनी नागपूर येथील राज्य शासनाच्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनावे असे आवाहन बिदरी यांनी केले. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना सावरून पुढे जाण्यासाठी उचित मार्गदर्शन करण्याकरिता समुपदेशन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.