चंद्रपूर : दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि खासदार मुकूल वासनिक यांनी तातडीने दिल्लीला बोलावून घेतल्याने काँग्रेसच्या वर्तुळात राजकीय चर्चा रंगली आहे. या भेटीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाला एक महिना दहा दिवसांचा अवधी झाला आहे. त्यांच्या पत्नी भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी हळूहळू राजकीय गाठीभेटी सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबईत शिवसेना कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर दिल्लीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, माजी खासदार राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून त्या वरोरा येथे मुक्कामी होत्या. मात्र रविवारी संध्याकाळी त्यांना दिल्ली येथे काँग्रेस नेत्यांनी तातडीने बोलावून घेतले. यावेळी दिल्ली येथे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी कॉंग्रेसचे दोन्ही महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि मुकूल वासनिक यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा मुलगा मानस सोबत होता.
हेही वाचा – खबरदार..! ट्रॅव्हल्सच्या प्रवाश्यांचे संपूर्ण नाव, पत्ता नसल्यास होणार कठोर कारवाई
या भेटीत नेमकी चर्चा काय झाली, याबाबत आमदार धानोरकर यांनी मौन बाळगले आहे. खासदारांच्या निधनानंतर वरिष्ठ नेत्यांची भेट झाली नव्हती. त्यामुळे ही भेट घेण्यात आली, असे सांगून या भेटीवर भाष्य करणे टाळले. मात्र दोन दिवसांच्या आत पुन्हा आमदार धानोरकर यांनी दिल्लीवारी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. या भेटीची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा येत्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोण अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी तथा येणाऱ्या काळातील राजकीय दिशा ठरविण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची मंगळवारी दिल्लीत बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा – उद्धव ठाकरे म्हणतात, ‘होऊन जाऊ दे चर्चा!’; पीएम केअर फंडाचा मागितला हिशोब
भाजपा तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गटातील अनेक नेते माध्यमांना प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे अनेक नेते मंडळी त्यांच्या संपर्कात आहेत, लवकरच तेदेखील सोबत येतील असे सांगत आहेत. या जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेतेदेखील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाच्या संपर्कात असलेले जिल्ह्यातील नेते कोण असाही प्रश्न आता विचारला जात आहे.