वर्धा : ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की गावातील सर्वच जिद्दीला पेटतात. येन केन प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केले जातात. त्यात दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात तर दारूचे आमिष सर्वात पुढे असते. त्याचीच प्रचिती होत असलेल्या निवडणुकीत येत आहे.
वाघोडा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाचा उमेदवार असलेला विकी दिवाकर मसराम याच्याकडून दारूसाठा जप्त करीत कारवाई झाली. तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला दहा लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. जाम चौकात ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या पथकासह कारवाई केली.
हेही वाचा – चंद्रपूर शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेचा कळस; जागोजागी कचऱ्याचे ढीग
चंद्रपूरवरून चारचाकीत येणारा दारूसाठा जप्त करीत अजय हजारे, बंडू आंबतकर, वैभव बारस्कर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूरच्या मॉडर्न वाईन शॉपच्या मालकावर कारवाई करण्यात आली आहे. याखेरीज दुचाकीवर ८० हजार रुपये किमतीचा दारूसाठा नेणाऱ्या शुभम ठवरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.