अकोला : गडद धुक्यातही रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे. गडद धुक्यामध्ये चालकाला अस्पष्ट दिसण्याच्या अडचणीवर रेल्वेने नव्या अडचणीद्वारे मात केली. मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्राचा वापर करून विपरित वातावरणात रेल्वेच्या सुरक्षेसाठीची मोठी झेप घेतली. सिग्नल दृश्यमानता कमी असताना रेल्वे चालकांना मदत होण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. या यंत्रणेमुळे कमी दृश्यमानतेशी संबंधित जोखीम लक्षणीयरित्या कमी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिवाळ्यामध्ये अनेकवेळा गडद धुक्याच्या वातावरणात रेल्वे चालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. चालकांना सिग्नल यंत्रणा व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येवर धुके सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून रेल्वेने उपाय शोधला आहे. हे यंत्र धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. रेल्वे चालकांना आगामी तीन सिग्नल्सची आगाऊ सूचना ‘ऑडिओ’ आणि ‘व्हिज्युअल’ संकेतांद्वारे देते. हे उपकरण केवळ पुढील सिग्नलचे वर्णन दाखवत नाही तर इंजिन आणि सिग्नलमधील मध्यवर्ती अंतर देखील सूचित करते तसेच आगामी बदलांसाठी योग्य तयारी सुनिश्चित करते. विविध चालक मार्गावरील सर्व सिग्नल्स आणि ‘लेव्हल क्रॉसिंग गेट्स’ जीपीएस स्थानांद्वारे काळजीपूर्वक ‘मॅप’ केलेले आहेत. यामध्ये ‘अलर्ट’ यंत्रणा असून वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलचे दिशा जाहीर करते. रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अधिक सतर्क आणि अधिक सुसज्ज राहण्यास मदत करते. हे यंत्र उजव्या हाताच्या बाजूला स्थित धोक्याच्या सिग्नलवर विशेष लक्ष देऊन सुरक्षा उपायांची माहिती देते.

हेही वाचा >>>‘त्या’ महिलेने ३६ दिवस भोगल्या नरकयातना, तीन नराधम दररोज करायचे सामूहिक बलात्कार

धुके सुरक्षा यंत्राचे विभागनिहाय वितरण करण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक २४८ उपकरणे भुसावळ विभागाला देण्यात आले. नागपूर विभागात २२० उपकरणे, मुंबई, पुणे विभागात प्रत्येकी १० व सोलापूर विभागात नऊ उपकरणे देण्यात आले. एकूण ४९७ उपकरणांच्या वितरणासह मध्य रेल्वेने विशेषत: प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत रेल्वे परिचालनाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. सुरक्षा उपाय आणि कार्यक्षमता अधिक मजबूत करण्यासाठी अतिरिक्त धुके सुरक्षा यंत्रणांची आणखी खरेदी करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

हेही वाचा >>>बहुगुणी क्विनोवा शेतीचा अनोखा प्रयोग, भरगोस उत्पादन कमी पाण्यात अन् कमी खर्चात!

गाड्यांचा वेग वाढण्यास मदत

धुक्यामुळे कमी दृश्यमानतेच्या घटनांमध्ये रेल्वे गाडीचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास दरम्यान असतो. ‘फॉग सेफ्टी डिव्हाईस’ (FSD)च्या अंमलबजावणीमुळे जास्तीत जास्त ७५ किमी प्रतितास वेग मिळू शकतो. त्यामुळे गाड्यांचा खोळंबा कमी होऊन नियोजित वेळेनुसार धावण्यास मदत होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of innovative fog protection system by central railway akola ppd 88 amy
Show comments