वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अंधारात ठेवून एका प्राध्यापकाचे ‘टॉकिंग ट्री’ हे ॲप चंद्रपूर येथील वन अकादमीने दुसऱ्याकडून तयार करून घेतले. एवढेच नाही तर, मुनगंटीवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे ॲप विकसित करणारे निसर्गप्रेमी प्राध्यापकही संभ्रमात पडले. याबाबत ते वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल करणार आहेत.
नागपूर येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील प्रा. सारंग धोटे यांनी २८ फेब्रुवारी २०२० मध्ये ‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलके झाड ही संकल्पना ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणली. दर्यापूर येथील महाविद्यालयाच्या आवारात पहिल्यांदा हा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. त्यापूर्वीच म्हणजे २७ फेब्रुवारी २०२० ला त्यांनी या ॲपवरील मालकी हक्कासाठी अर्ज दाखल केला. राज्यातील अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांसह अनेक ठिकाणी गरज आणि मागणीनुसार ते ॲप विकसित आणि स्थापित करून दिले. परदेशातून या ॲपची मागणी आल्यानंतर तेथेही ते विकसित करून दिले. चंद्रपूरच्या खत्री महाविद्यालयाने ही संकल्पना प्रा. धोटे यांच्याकडून स्थापित करून घेतली. त्यानंतर वन अकादमीकडून प्रा. धोटे यांना या ॲपविषयी विचारणा करण्यात आली. वन अकादमीच्या परिसरातील झाडे बोलकी करण्यासाठी खर्चाचा अंदाज त्यांनी विचारला. मात्र, दोन आठवडे उलटूनही वन अकादमीच्या अधिकाऱ्यांनी संवाद न झाल्याने प्रा. धोटे यांनी त्यांना स्वत:च विचारणा केली असता स्थानिक कंपनीला हे काम दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या ॲपचे नावासह हक्क माझ्याकडे असताना तुम्ही कसे काय ते इतरांकडून करून घेतले, अशी विचारणा त्यांनी अकादमीच्या अधिकाऱ्यांना केली. त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. सुधीर मुनगंटीवार यांनी वन अकादमीत या संकल्पनेचे उद्घाटन केले तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
वन अकादमीच्या अधिकाऱ्यांनी मला हे ॲप स्थापित करण्याचे काम दिले नाही, याचे दु:ख नाही. अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू मांडली असती तर ते नि:शुल्क करून दिले असते. मात्र, कायदेशीररीत्या त्यावरील सर्व हक्क माझे आहेत. वन अकादमीकडून ही अपेक्षा नव्हती. -प्रा. सारंग धोटे, ‘टॉकिंग ट्री’ ॲपचे निर्माता
मेळघाटात असताना प्रा. सारंग धोटे यांना ॲप तयार करण्यास सांगितले आणि त्यांनी ते केले. वन खात्याने त्यांच्याकडून हे ॲअॅप खरेदी केले आहे. त्यामुळे या ॲपवर आता वन खात्याची मालकी आहे. -श्रीनिवास रेड्डी, संचालक, वन अकादमी
वन अकादमीच्या अधिकाऱ्यांनी मला हे ॲप स्थापित करण्याचे काम दिले नाही, याचे दु:ख नाही. अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू मांडली असती तर ते नि:शुल्क करून दिले असते. मात्र, कायदेशीररीत्या त्यावरील सर्व हक्क माझे आहेत. वन अकादमीकडून ही अपेक्षा नव्हती. – प्रा. सारंग धोटे, ‘टॉकिंग ट्री’ ॲपचे निर्माता
मेळघाटात असताना प्रा. सारंग धोटे यांना ॲप तयार करण्यास सांगितले आणि त्यांनी ते केले. वन खात्याने त्यांच्याकडून हे ॲप खरेदी केले आहे. त्यामुळे या ॲपवर आता वन खात्याची मालकी आहे. – श्रीनिवास रेड्डी, संचालक, वन अकादमी