नागपूर : राज्य पोलीस दलात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे.राज्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या २ हजार २७२ जागा रिक्त आहेत तर पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची ३६६ पदे रिक्त आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राज्य पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक,पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त आहेत. राज्यातील जवळपास सर्वच पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांची वाणवा आहे. तपास अधिकाऱ्यांकडे क्षमतेपेक्षा जास्त गुन्ह्यांचे प्रकरणे  देण्यात येतात. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अनेक तपास प्रलंबित आहेत. यातच त्याच पोलीस अधिकाऱ्यांकडून राजकीय नेत्यांचे, मंत्र्यांचे बंदोबस्त आणि सण-उत्सव काळातील बंदोबस्त करुन घेण्यात येत आहेत. रिक्त पदांमुळे अनेक तपास संथ गतीने सुरु असून त्याचा परिणाम दोषसिद्धीवरसुद्धा पडत आहेत. राज्यात सध्या सुमारे ३ हजार पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. शिवाय पोलीस दलात कार्यरत व पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नतीलाही विलंब होत आहे. ठाणेदारांची बरीच पदे रिक्त असल्यामुळे अनेक पोलीस ठाण्याला प्रभारी पद नाही. तसेच काही संवेदनशील गुन्ह्याचा तपास करण्याकरिता पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची कमतरता असून अडचणी निर्माण होत आहेत. राज्यात पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या २ हजार २७२ जागा रिक्त आहेत. कोकण परिक्षेत्रात सर्वाधिक १६८४ पोलीस उपनिरीक्षकांची पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची ३६६ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षकांची सर्वाधिक रिक्त पदे (२०५) कोकण विभागात रिक्त आहेत.

एका अधिकाऱ्याकडे प्रकरणे प्रलंबित

तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज असते. मात्र, पोलीस दलात उपनिरीक्ष अधिकाऱ्यांच्या सव्वादोन हजारांपेक्षा जास्त रिक्त असल्यामुळे एका अधिकाऱ्यांकडे अनेक तपास देण्यात येतात. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी अवस्था सध्या तपास अधिकाऱ्यांची झाली आहे. गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने समन्वय साधून या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे.

सर्वाधिक रिक्त जागा मुंबई-पुण्यात

राज्यात रिक्त पदे असलेल्या आयुक्तालयात मुंबई आणि पुणे पोलीस आयुक्तालय पहिल्या स्थानावर आहे. मुंबई क्षेत्रात पोलीस उपनिरीक्षकांच्या सर्वाधिक १६८४ जागा रिक्त आहेत. पुण्यात २१९ पदे, नागपुरात १०८ पदे, छत्रपती संभाजीनगरात १०१ पदे तर अमरावतीमध्ये ८६ पदे रिक्त आहेत. कोकण एक आणि नाशिकमध्ये प्रत्येकी ३७ पदे रिक्त आहेत.

Story img Loader