नागपूर : गणेशपेठ बसस्थानक परिसरातील रॉय उद्योग समूहाच्या रजत संकुल इमारतीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय वीजबिल, थकीत भाडे यामुळे रिकामे करण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पाच वर्षांचा भाडे करार संपल्याने हे कार्यालय रिकामे केल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे.
उद्योजक किशोर राय यांच्या मालकीच्या रजत संकुल इमारतीत शिवसेनेचे विभागीय कार्यालय होते. तानाजी सावंत संपर्क प्रमुख असताना या कार्यालयाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर अनेक संपर्क प्रमुखांनी याच ठिकाणी बैठकांमधून शिवसेनेला मजबूती देण्याचा प्रयत्न केला. असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटावर हे कार्यालय बंद करण्याची वेळ आली. तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात ‘भाडे करारतत्वावर कार्यालय आम्ही घेतले होते. आता तो करार संपला. त्यामुळे चार महिन्यापूर्वीच हे कार्यालय आम्ही रिकामे करून दिले. मालकाला ते त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी रिकामे करून हवे असल्याने आम्ही ते रिकामे करून दिले, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते नितीन निवारी यानी माध्यमांशी बोलताना दिली.