लोकसत्ता टीम
वाशीम: घरची हलाखीची परिस्थिती मात्र, कितीही गरीबी, अडचणं असली तरी लेकराला शिकवायचं. त्यासाठी मोल मजुरी केली. शिक्षणासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून ही अडचण उदभवल्याने वेळप्रसंगी अंगावरील दाग दागीने मोडले. परंतू मुलाला शिकविले. त्यानेही गरीबीची जाण ठेवून उपाशी पोटी राहून, मिळेल ते काम केले. हे सगळ बळं मिळालं ते बाबासहेबांच्या प्रेरणेतून, बाबासाहेब होता येणार नाही. परंतू त्यांचे विचार घेऊन रिसोड तालुक्यातील पेडगाव येथील गरीब कुटुंबातील वैभव सोनुने थेट ब्रिटनला पुढील शिक्षणासाठी जातोय, त्यासाठी त्याला नामांकित तीन वेगवेगळया विद्यापीठाकडून जवळपास दीड कोटींच्या शिष्यवृत्ती मंजूर झाल्या आहेत.
बाबासाहेबांसारखंच माझं लेकरु पण विदेशात जात असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे वैभवचे आई वडील यांनी सांगीतले. वैभवचे मुळ गाव रिसोड तालुक्यातील पेडगाव आहे. मात्र, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामूळे त्याचे वडील नाशिक येथे बांधकाम मजूर म्हणून काम करुन कुटुंबाचा प्रपंच चालवित होते. अशातच २००१ मध्ये वडीलांचा अपघात झाल्यामूळे ते त्यांच्या पेडगावी परतले. वैभवचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. तसेच संत सखाराम महाराज लोणी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतील राज्यशास्त्र या विषयात प्रवेश घेतला. पुढे बैंगलोर येथे एम.ए. डेव्हलपमेंट या विषयावर शिक्षण पूर्ण केले आहे.
घरची अत्यंत गरीबीची परिस्थिती असल्यामूळे वैभवला शिक्षणासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. काही दिवस मित्राकडे राहीला. काही दिवस नातेवाईकांडे काढले. वसतीगृहातही राहीला. मोल मजुरी सुध्दा केली. त्यांच्या शिक्षणासाठी त्याच्या आई वडीलांनी देखील अहोरात्र कष्ट घेऊन मदत केली. त्याची शिकण्याची धडपड बघून राजु केंद्रे यांने त्याला विदेशातील शिष्यवृत्तीविषयी माहिती देऊन तीच्या साठी प्रयत्न करायला सांगीतले. परंतू घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ते जमले नाही. परंतू राजुच्या वेळोवेळीच्या मागदर्शनामूळे वैभवने तयारी केली आणि त्याला चिवनिंग अवार्ड ही शिष्यवृत्ती युनिव्हरसिटी ऑफ लीडस मध्ये पर्यावरण व विकास याकरीता तर कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिवर्सिटी ऑफ लीडस मध्येच आणि कॉमनवेल्थ शेयर्ड स्कॉलरशिप युनिवर्सिटी ऑफ इस्ट एंजिया मध्ये शेती आणि ग्रामीण विकास या अभ्यासक्रमासाठी मंजुर झाली आहे. शिक्षण घेतांना आलेल्या अडचणीसाठी त्याचे शिक्षक, विद्यादान सहाय्यक मंडळ व काही सामाजिक संस्थांचा मोठा हातभार मिळाला.
वैभवच्या घरी आजही टिव्ही नाही, परंतू पुस्तकाचे कपाट आहे
वैभवच्या घरी आजही टिव्ही नाही. मात्र पुस्तकांचे कपाट आहे. लहानपणापासून वडील बाजारात गेले की, हमखास पुस्तके आणायचे. त्यातही बाबासाहेबांच्या मुळ पुस्तकांचा समावेश अधीक असायचा चौथीत शिकत असतांनाच वडीलांनी बाबासाहेबांचे पुस्तक हाती दिले आणि तेव्हापासून जीवन जगण्याचा मार्गच बदलला असे वैभव म्हणतो.
विकसीत देश्याच्या बजेटमध्ये पर्यावरण विषय आहे. आपल्याकडे पर्यावरण चर्चेत देखील नाही. मी ज्या सामाजिक घटकातून येतो.तीथे अजूनही संधीची समानता नाही. निर्सगाच्या सानिध्यात राहणारा आदीवासी, ओबीसी, दलित पर्यावरणाच्या पॉलीसीत नाही. त्याची दिशा एसीत बसणारे ठरवितात. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरणात भरीव कार्य करायचे असून बाबासाहेबांचा आदर्श डोळयासमोर ठेवून जगायचे आहे. असे मत वैभव सोनुने यांनी व्यक्त केले. वेळेवर शिष्यवृत्ती मिळाली नाही तर शिक्षणासाठी मदतीची अपेक्षा समाजकडून, स्वयंसेवी संस्थाकडून असल्याचेही वैभव सांगतो.