लोकसत्ता टीम
नागपूर : भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन प्रमुख राजकीय पक्षासाठी अतिशय प्रतिष्ठेची ठरलेल्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसाने मतदान होणार आहे. विदर्भाच्या सीमेला लागून असलेल्या मराठी भाषिक बहुल मतदारसंघात भाजप व काँग्रेसने विदर्भातील बडे नेते प्रचारात उतरवले आहेत.
विदर्भाला लागून असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यात मोठ्या संख्येने मराठी भाषिक मतदार आहेत. त्याचप्रमाणे इंदोर जिल्ह्यातील काही मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. छिंदवाडा हा काँग्रेस नेते कमलनाथ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तर इंदोरवर भाजपचे वर्चस्व आहे. मराठी भाषिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने वैदर्भीय नेत्यांची फळी प्रचारात उतरवली आहे. भाजपचे स्टार प्रचारक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन प्रचार दौरे झाले आहेत.
आणखी वाचा-समृद्धी महामार्गावर महिलेचा मृतदेह, गूढ कायम
फडणवीस यांनी १० नोव्हेंबरला इंदोर व बुरहानपूर विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतल्या. त्यानंतर बुधवारी १५ नोव्हेंबरला त्यांच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुर्णा, सौंसर या नागपूर जिल्ह्याला लागून असलेल्या दोन विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा झाल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर आणि परासिया या दोन मतदारसंघात १४ तारखेला सभा घेतल्या. याशिवाय नागपूरचे भाजप नेते आ. प्रवीण दटके, विदर्भातील आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार परिणय फुके यांच्यासह इतरही अनेक नेते मध्य प्रदेशमध्ये पक्षाची प्रचारधुरा सांभाळत आहेत.
मतदारांवर काँग्रेसचीही नजर असून माजी मंत्री व ज्येष्ठ नेतेद्वय सुनील केदार व यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, विदर्भातील आ. धीरज लिंगाडे यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडे पक्षाने प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.