लोकसत्ता टीम
यवतमाळ: महागाव तालुक्यातील पोखरी (इजारा) येथील वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने अखिल भारतीय प्री-मेडिकल प्रवेश परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला आहे.
ऑल इंडिया रँकमध्ये तिचा २३० वा क्रमांक आहे, तर ऑल इंडिया ओबीसी ग्रुपमध्ये ती ४४ व्या क्रमांकावर आहे. तिच्या या यशाने महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. १२ वर्षांपूर्वी एका रस्ता अपघातात वडिलांचा मृत्यू झाला. पितृछत्र हरवल्याने शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. जणू सर्वच संपले होते. खेडेगावात शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून २५० किमी अंतरावर मामाच्या घरी जाऊन वैष्णवीने प्रयत्नांची पराकाष्टा केली.
हेही वाचा… विदर्भातही शिंदे गटाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद वाढली
विशेष म्हणजे कोणतीही शिकवणी न लावता स्वत: घरी अभ्यास करून तिने हे यश मिळविले म्हणून या यशाला अधिक महत्व आहे. वैष्णवीने शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाला एका तपानंतर यशाचे फळ आले. या यशानंतर पोखरी या बंजारा बहुल गावाची रहिवाशी असलेली वैष्णवी नीट परीक्षार्थींची आयकॉन ठरली आहे.
हेही वाचा… नागपूर : शहरातील दहन घाटच ‘मरणासन्न’!
वैष्णवीचे वडील रोहिदास राठोड यांचा २०११ मध्ये मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. या धक्क्याने कुटुंब उद्धवस्त झाले. वैष्णवीची आई सुनीता ही गृहिणी आहे. मोठी बहीण अश्विनी आणि वैष्णवी या दोघीही शिक्षणात अत्यंत तल्लख. वडिलांचा आधार गेल्यामुळे अनाथ झालेल्या मुलींना मामा शंकर बळीराम जाधव यांनी सहारा दिला. ते चंद्रपूर येथे महाजेनको मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन्ही भाच्यांची त्यांनी जबाबदारी उचलली. वैष्णवीची मोठी बहीण अश्विनीसुद्धा नीट परीक्षेत चमकली होती. एमबीबीएसचा प्रवेश थोड्या गुणांनी हुकल्यामुळे ती बीएएमस करीत आहे.
वैष्णवीने मात्र कठोर परिश्रम करून देदिप्यमान यश संपादन केले. चंद्रपूर येथील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयात ती शिकत होती. कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय केवळ शाळेत तयारी करून तिने हे अभूतपूर्व यश मिळविले. पितृछत्र गमावल्यानंतरही वैष्णवीने चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर हे यश मिळविले.
अभ्यासातील सातत्याने यश
अभ्यासातील सातत्य, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई, मोठी बहीण व मामांच्या प्रोत्साहनामुळे यशाला गवसणी घालू शकले, असे वैष्णवीने सांगितले. एमबीबीएस अभ्यासक्रमानंतर एमडी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून कार्डियालॉजिस्ट किंवा यूरोलॉजिस्ट होणार असल्याचे ती म्हणाली.