नागपूर : ‘प्रेम म्हणजे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’ ही आता जुन्या काळाची गोष्ट झाली. नव्या काळात प्रेमाला अनेक नवी नावे, नव्या संज्ञा प्राप्त झाल्या आहेत. जेन-झी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नव्या पिढीने प्रेमाच्या स्वरूपानुसार त्याचे नामकरण केले आहे. जुन्या पिढीसाठी नवी बाब असणारे बेंचिंग, ब्रेडक्रम्बिंग, थ्रोनिंगसारख्या गोष्टी जेन-झीसह तरुण पिढीसाठी जीवनाचा भाग बनल्या आहेत.
एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे तसेच नव्या विचाराचे युग आहे. नवी पिढी नव्या विचारांना, नव्या गोष्टींना सहजपणे स्वीकारते आणि त्याला जीवनाचा भाग बनवते. यातून प्रेमासारखा विषयही सुटलेला नाही. समाज माध्यमांच्या लोकप्रियतेमुळे या गोष्टी लगेच प्रसारितही होतात. नैतिकता, समाजमान्यता या गोष्टींना मागे सारत नवी पिढी बिनधास्तपणे प्रेमाच्या या नव्या बाबींचा आनंद घेत असल्याचे बघायला मिळते. व्हॅलेंटाईन दिवसाच्या पार्श्वभूमीवर यावर अधिक प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न….
प्रेमाची नवी परिभाषा
● बेंचिंग – एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यात असताना दुसरा पर्यायही तयार ठेवणे.
● ब्रेडक्रम्बिंग – व्यक्ती प्रेमाच्या बंधनात असतात पण नात्यात गंभीरता नसते.
● नॅनोशिप – अतिशय कमी कालावधीसाठी एखाद्याच्या प्रेमात राहणे.
● पॉकेटिंग – यात प्रेमसंबंध अतिशय गुप्त ठेवले जातात. केवळ जवळच्या व्यक्तींनाच याबाबत माहिती दिली जाते.
● टेक्स्टेशनशिप – यात प्रत्यक्षात नव्हे तर ऑनलाइन नातेसंबंध असते.
● ऑरबिटिंग – दोन व्यक्ती एकमेकांशी थेट संवाद साधत नाही, पण समाज माध्यमावर ‘स्टॉक’ करतात.
● थ्रोनिंग – एखाद्या व्यक्तीची सामाजिक, आर्थिक स्थिती बघून प्रेम करणे.
● घोस्टिंग – अचानकपणे काहीही कारण न देता प्रेमसंबंध संपवणे.
● कफिंग – विकेंडमध्ये किंवा सुट्ट्यांदरम्यान प्रेमसंबंध ठेवणे.
● लव्ह बॉम्बिंग – यात प्रेमाचे सार्वजनिकरित्या नियमित प्रदर्शन केले जाते.
● कुशनिंग – एखाद्याच्या प्रेमात असताना त्याने प्रेमसंबध तोडल्यावर दुसरा पर्याय आधीच तयार ठेवणे.
● किटनफिशिंग – अतिशयोक्ती करणारी प्रतिमा तयार करून प्रेमसंबंध स्वीकारणे.