लालबुंद गुलाबाच्या साक्षीने आज मागणार प्रीतीचे दान
नागपूर : अवघी सृष्टी पानगळीच्या अस्वस्थ झळांना सामोरी जात असताना तरुणाईच्या हृदयात मात्र प्रेमाचा नवा बिजांकुर उगवतोय. लालबुंद गुलाबाच्या साक्षीने प्रीतीचे दान मागण्यासाठी नागपूरकर तरुणाई सज्ज झाली आहे. व्हॅलेंटाईन-डे असे गोंडस नाव असलेला हा प्रेमोत्सव उद्या गुरुवारी जगभरात मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. आपल्या नागपुरातही त्याची जोरदार तयारी झाली आहे. गुलाबपुष्पे, भेटवस्तूंची विक्री जोरात आहे.
गुलाबाच्या फुलाची प्रकृती जशी नाजूक असते तसा प्रीतीचा बंधही हळवा असतो. गुलाब जसा सुगंधित असतो तसा प्रेमाचा गंधही दरवळत असतो आयुष्यभर. गुलाबातही लालच गुलाब का माहिती आहे? कारण, रक्ताचा रंग लाल असतो आणि एकदा का प्रेम रक्ताशी एकरूप झाले की मग त्याला विभक्त करता येत नाही म्हणून. हाच लालबुंद गुलाब छातीशी कवटाळत ही प्रेमोत्सवी तरुणाई धडधडत्या हृदयाने जीवलगासमोर आपली हळवी भावना व्यक्त करणार आहे. ही गुलाबी भावना व्यक्त करताना सभोवतालचा परिसरही गुलाबी हवा म्हणून ही तरुणाई उद्या फुटाळा तलाव, अंबाझरी, तेलंगखेडी उद्यानात गर्दी करणार आहे.
काही कथित संस्कृती रक्षकांनी असा प्रेमोत्सव साजरा करणाऱ्यांना धमकी दिल्याने काही अघटित घडू नये यासाठी पोलिसांनीही विशेष नियोजन केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये या दिवसाचे विशेष आकर्षण असल्याने उद्या सकाळपासूनच कॉलेज कट्टे फुलणार आहेत. केवळ तरुणाईच नाही तर वयस्क मंडळींनीही कुटुंबासोबत हा दिवस साजरा करण्यासाठी नियोजन केले आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील अनेक छोटय़ा-मोठय़ा हॉटेल्सनी सवलतीचे पॅकेज आणले आहेत. या पॅकेजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकूणच काय तर व्हॅलेंटाईन-डेनिमित्त नागपूरनगरी प्रेमरंगात न्हाऊन निघाली आहे.