लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : बीडचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा राज्यात गाजत आहे. अधिवेशन काळात विरोधकांनी या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरले आणि आरोपीच्या तात्काळ अटकेची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनेही याप्रकरणात आरोपी कुणीही असो त्याला सोडणार नाही अशी ग्वाही दिली होती. मात्र या प्रकरणात ज्या वाल्मिक कराडला अटकेची मागणी केली जात आहे तो चक्क मुख्यमंत्र्याच्या नाकाखाली अधिवेशन काळात नागपूरमध्ये असताना त्याला शोधण्यात पोलीस अपयशी ठरले असल्याचा धक्कादायक आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केला. अंतिम आठवडा सप्ताहात संबोधित करताना दानवे यांनी याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले.

या हत्या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड आहे. तो एका मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. मागील दिवस त्याचे नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलीस त्याला पकडू का शकले नाही असा सवाल करत आरोपींना राजकीय आश्रय देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.

आणखी वाचा-विधानसभा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र, जयभीम घोषणा अन्…

कायदा व्यवस्था ढासळली

सत्ताधारी राज्याची कायदा सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरले आहे. जनतेच हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी व अकार्यक्षम सरकार असल्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली. राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेलं असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे. ५ डिसेंबरला शपथविधी होऊन शासनाला खाते वाटप करता आले नाही, असा टोला त्यांनी रखडलेल्या खातेवाटपावर लगावला. मागील आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यात घडलेल्या घटनांकडे शासनानेन पाठ फिरवली असल्याची टीका दानवेंनी केली.

आणखी वाचा-गडचिरोली : आठ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

राज्यातील शिक्षण आरोग्य, उद्योग विभागाची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत गुन्हेगारीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. २०२३ मध्ये ४५ हजार ४३४ महिला अत्याचाराच्या घटना नोंदविण्यात आल्या. सायबर गुन्ह्यातही राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री यांचा जिल्हा असलेल्या नागपूर शहरात अधिवेशन सुरू असताना दोन टोळ्यांमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. ऑक्टोबर महिन्यात माजी विधानसभा सदस्य बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यापूर्वी त्यांची रेकी केली होती. आज राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या घराची रेकी झाल्याचा प्रकार समोर आला. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या झाली. सत्ताधारी यांची ही स्थिती असल्यास सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valmik karad in nagpur during session shocking claim by opposition leader ambadas danve tpd 96 mrj