वर्धा : वेगळा विदर्भ समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा ते नागपूर, अशी विदर्भ निर्माण यात्रा सुरू आहे. वेगळा विदर्भ का? यावर बोलताना चटप यांनी भाष्य केले आहे.
वामनराव चटप म्हणाले की, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी एमएसआरडीसीला पासष्ट हजार कोटी रुपयांचे कर्ज उभे करायचे आहे. त्याला राज्य सरकारची थकहमी आहे. आधीच सहा लाख ६० हजार कोटींचे कर्ज, त्यात ही थकहमी व विविध जबाबदाऱ्या असणारे राज्य कधीच सक्षम होऊ शकत नाही. म्हणून विदर्भातील जनता शंभर वर्षे महाराष्ट्रात राहली तरी त्यांचा अनुशेष कधीच भरून निघू शकत नाही.
हेही वाचा – ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय? डॉ. मोहन भागवत यांचा सवाल
विदर्भ स्वतंत्र राज्य हाच पर्याय आहे. राज्यातील दोन हजार सातशे ओसाड गावांपैकी दोन हजार तीनशे गावं विदर्भातील असण्याची आकडेवारी चिंतनीय आहे. सरकार ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ अशी घोषणा करते. मग छोटे राज्य सुखी राज्य का होऊ नये,असा सवाल चटप यांनी केला. काँग्रेस व भाजपा हे विदर्भ विरोधी असून, ते कधीच स्वतंत्र विदर्भ होऊ देणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. माजी आमदार सरोज काशिकर, प्रभाकर कोंडबतूनवार, सतीश दाणी यांनीही मतं व्यक्त केली.