अकोला : जिल्ह्यातील अकोला, अकोट व बार्शिटाकळी बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उद्या, २९ एप्रिलला होणाऱ्या मतमोजणीनंतर बाजार समित्यांवर वर्चस्व कुणाचे,  हे स्पष्ट होणार आहे. १३८ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. वंचित आघाडी थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीतील चुरस वाढली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, बार्शिटाकळी, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अकोला, अकोट व बार्शिटाकळी बाजार समित्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान करण्यात आले. अकोल्यातील श्री शिवाजी विद्यालयात, अकोटमध्ये नगर परिषद शाळा क्र.सातमध्ये, तर बार्शिटाकळी येथे गुलाब नबी आझाद महाविद्यालयातील मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी केली होती. 

हेही वाचा >>> अमरावती जिल्‍ह्यातील सहा बाजार समित्‍यांमध्‍ये कौल कुणाला? खासदार, आमदारांची प्रतिष्‍ठा पणाला

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवा सहकारी संस्थेमध्ये ७३१ मतदारांपैकी ७१३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ९७.५ टक्के आहे. ग्रामपंचायत मतदारांमध्ये ७२९ पैकी ७०१ मतदारांनी मतदान केले. अकोला व बार्शिटाकळीमध्ये देखील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. उद्या सकाळी ९ वाजतापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. 

दुसऱ्या टप्प्यात चार समित्यांसाठी मतदान

दुसऱ्या टप्प्यात ३० एप्रिल रोजी जिल्ह्यातील पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit aghadi dominates the market committees in akola district ppd 88 ysh
Show comments