अकोला : वंचित बहुजन आघाडीला मिळणारा वाढता पाठिंबा आणि महासभांमध्ये दिसलेला प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीला दिसत नाही का, की त्यांचा अहंकार त्यांना वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यापासून रोखत आहे. वंचितांची मदत घ्यावी लागते यात कमीपणा वाटतो का, असे सवाल करीत वंचित आघाडीचे प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवरच थेट प्रश्न उपस्थित केला.
अहंकार बाजूला ठेऊन वंचित आघाडीला सोबत घ्या, अन्यथा पक्षाला अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असा निर्वाणीचा इशारादेखील त्यांनी दिला. वंचित आघाडी व काँग्रेसमधील आघाडीचा मुद्दा रेंगाळला आहे. या प्रकरणी वंचित आघाडीने काँग्रेससह महाविकास आघाडीवर निशाना साधला. काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इतिहासातून युतीचे महत्त्व शिकायला पाहिजे. हिटलरचा पराभव हा अनेक देशांच्या एकजुटीतूनच झाला होता. महाविकास आघाडीने अद्याप वंचित बहुजन आघाडीला का सहभागी करून घेतले नाही, हे कोडे उभ्या महाराष्ट्राला पडले आहे, असे डॉ. पुंडकर म्हणाले.
हेही वाचा – सत्यपाल महाराजांचे फेसबुक पेज ‘हॅक’
संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपाला हरवायची ‘प्रामाणिक’ इच्छा असेल, तर त्यांनी त्यांचा अहंकार बाजूला ठेवावा आणि वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये आमंत्रित करावे. पक्षीय अहंकार आणि इतर पक्षांना सोबत न घेतल्याचा परिणाम काय होतो हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसून आले. महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचा भाग होण्याची तयारी वंचितने वारंवार बोलून दाखवली. परंतु, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वागणुकीमुळे जनतेमध्ये रोष निर्माण होत असल्याचा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला.