अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खेळीमुळे वंचित बहुजन आघाडीवर नामुष्की ओढावली. अधिकृत उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे वंचितच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. अखेर वंचित आघाडीने आज भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. वंचितच्या भूमिकेमुळे मतदारसंघातील लढतीवर परिणाम होणार असून भाजपसह काँग्रेसच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अकोला पश्चिम मतदारसंघातून अधिकृत उमेदवार डॉ. झिशान हुसेन यांनी माघार घेऊन वंचितला मोठा धक्का दिला होता. मतविभाजन टाळण्यासाठी काँग्रेसची ही मोठी खेळी होती. या मतदारसंघात काँग्रेसने साजिद खान पठाण यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा…मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला
त्यांची उमेदवारी जाहीर होताच अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून निवडणूक लढण्यासाठी ‘वंचित’ची वाट निवडली होती. वंचित आघाडीने डॉ. हुसेन यांना उमेदवारी देखील दिल्याने त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजन होऊन त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला असता. वंचितचे अधिकृत उमेदवार असतांनाही डॉ. हुसेन यांनी निवडणुकीतून माघार घेतली. वंचितसह भाजपसाठी हा मोठा धक्का मानला गेला.
हेही वाचा…गोंदियात प्रचाराची पातळी खालावली, एक म्हणतो कंत्राटदार, दुसरा म्हणतो भूमिपूजनदास
अकोला पश्चिममध्ये वंचितचा अधिकृत उमेदवार नाही. पक्षासोबत काँग्रेसने दगाफटका केल्याचा आरोप वंचित आघाडीकडून झाला. वंचितचे अकोला जिल्हा हे प्रभाव क्षेत्र आहे. अकोला पश्चिममध्ये वंचितची दखलपात्र मतपेढी असतांना त्याठिकाणी वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली. वंचित काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वंचित आघाडीने नरेंद्र मोदी यांची अकोल्यातील सभा झाल्यानंतर भूमिका घेण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज वंचितने अकोला पश्चिम मधून आपला पाठिंबा जाहीर केला. भाजपचे बंडखोर, अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांना आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचितचा काँग्रेसवर उलट डाव
अकोला पश्चिममध्ये आता हरीश आलिमचंदानी वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत. वंचितच्या या निर्णयावरून पक्षांतर्गत मत-मतांतरे आहेत. वंचितने भूमिका घेऊन काँग्रेसवर उलट डाव टाकला. काँग्रेस व भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहे.