अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात ॲड. प्रकाश आंबेडकर सलग अकराव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळेस त्यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह निवडणूक विभागाकडून देण्यात आले. सिलिंडरसाठी इच्छूक असलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या चिन्हाचा निकाल ईश्वर चिठ्ठीद्वारे लागला. आता ॲड. आंबेडकरांच्या कुकरचे ‘प्रेशर’ नेमके कुणावर हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात परंपरेनुसार यावेळेस देखील तिरंगी लढत होत आहे. भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघात घेतल्यानंतर आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. सिलिंडर या चिन्हाची मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) व शेख नजीब शेख हबीब (इंडियन नॅशनल लिग) या दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आली होती. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात हे चिन्ह शेख नजीब शेख हबीब यांना मिळाले. प्रकाश आंबेडकर यांना ‘प्रेशर कुकर’ हे चिन्ह मिळाले आहे.
हेही वाचा : आश्चर्य! ‘या’ उमेदवाराकडे केवळ ५०० रुपयांची मालमत्ता, देशातील दुसरा सर्वात गरीब…
वेगवेगळ्या चिन्हांवर लढले निवडणूक
अकोला लोकसभेत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या १० निवडणुका लढल्या आहेत. यापूर्वी त्यांना उगवता सुर्य, बंगला, कपबशी आदी चिन्हे मिळाली आहेत. आता ॲड. प्रकाश आंबेडकर सिलिंडर चिन्हासाठी इच्छूक होते. त्यासाठी त्यांनी प्रतिनिधीमार्फत अगोदरच उमेदवारी अर्ज देखील केला होता. मात्र, दोघांनी त्याच चिन्हावर दावा केल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यात आंबेडकरांना सिलिंडर मिळाले नाही. त्यामुळे त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले आहे.