अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पदरी निराशा पडल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून नव्याने डाव टाकण्यात येत आहे. वंचितकडून लढण्यासाठी राज्यभरातील इच्छुकांकडून २६ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागांवर स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी वंचितने सुरू केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. महाविकास आघाडीसोबत चर्चेचे गुऱ्हाळ चालल्यानंतर अखेर वंचितने स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढली. काही जागांवर काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व अपक्षांना वंचितने पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३८ जागांवर वंचित आघाडीने आपले उमेदवार स्वबळावर उभे केले. २०१९ मध्ये वंचितने दखल पात्र मते घेतली होती. मात्र, २०२४ मध्ये उतरती कळा लागल्याचे चित्र होते. मतांचा टक्का प्रचंड घसरला. ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यातून पराभूत झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांची मते देखील कमी झाली. वंचितचे गठ्ठा मतदार असलेले दलित, मुस्लीम व इतर अल्पसंख्याक समाजाची बहुतांश मते यावेळेस ‘मविआ’कडे वळली. त्यामुळे वंचितच्या मतांमध्ये घट होऊन नुकसान झाले. लोकसभेतील या अपयशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेतील उमेदवारांशी बैठकीत चर्चा करून पराभवाची कारणे जाणून घेतली. पक्षाच्या कामगिरीवर चिंतन करण्यात आले. लोकसभेतील पराभवामुळे हताश न होता विधानसभेसाठी नव्याने कामाला लागण्याची सूचना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा : चंद्रपूर : धारदार शस्त्राने महिलेचा खून, बाबा आमटेंच्या आनंदवनात पहिल्यांदाच…

राज्यात आगामी तीन महिन्यात विधानसभा निवडणूक लागणार आहेत. या निवडणुकीसाठी वंचित कामाला लागली. ‘मविआ’सोबत वंचितचे सूर जुळले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील पुन्हा एकदा वंचित स्वबळावर तयारीला लागली आहे. मात्र, आघाडी संदर्भात चर्चेची द्वारे अद्याप बंद झालेली नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले. लोकसभेतील पराभवाची मरगळ झटकून विधानसभा निवडणुकीत नव्याने मैदानात उतरण्यासाठी वंचित आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाकडून जिल्हानिहाय निरीक्षकांची नेमणूक करून जबाबदारीचे वाटप करण्यात आले. वंचितकडून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून २६ जून ते २६ जुलै या एक महिन्यात अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे अर्ज ऑनलाइन मागविले आहेत. सोबतच मुंबईच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टाने देखील अर्ज पाठवता येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या शिफारसीनुसार इच्छुकांकडून अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरविण्यात येणार असल्याचे वंचितकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : ‘एमपीएससी’ देणाऱ्या महिला उमेदवारांना दिलासा, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ची अट रद्द

फटका कुणाला?

लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढल्याने राज्यात किमान चार जागांवर महाविकास आघाडीला फटका बसल्याची चर्चा आहे. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वंचित स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास काय होईल, यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक वंचित संपूर्ण ताकदीने लढणार आहे.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते, वंचित आघाडी.
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi assembly elections 2024 seat discussion with mahavikas aghadi ppd 88 css