नागपूर : वंचित बहुजन विकास आघाडीवर नेहमी ते भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. आता तर वंचितचे कार्यकर्तेच भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहे. नागपूरमध्ये उत्तर नागपूर या राखीव मतदासंघातील वंचित बहुजन आघाडीच्या २२ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असे या भागाचे भाजपचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्याकडून कळवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ पासून प्रत्येक वेळी लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की वंचित बहुजन आघाडीवर ते भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला जातो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही काही प्रमाणात तो झाला. वंचित कडून वेळोवेळी हा आरोप फेटाळून लावला गेला. भाजप इतकाच काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितचा विरोध असल्याचे या पक्षाकडून सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केलेला पक्ष प्रवेश महत्वाचा मानला जातो.

हेही वाचा…मोदींवर टीका करताच भाजप आमदार भडकले….वारकऱ्याला थेट मारण्याची धमकी दिल्याचा…

मंगळवारी भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या २२ कार्यकर्त्यांनी अनिकेत मेश्राम यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजपकडून अधिकृतपणे कळवण्यात आले. यावेळी भाजपचे विदर्भ विभागीय संघटन सचिव उपेद्र कोठेकर , उत्तर नागपुरचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार व उत्तर नागपूरचे प्रभारी गिरीश व्यास, उत्तर नागपूर भाजप आघाडीचे अध्यक्ष गणेश कानतोडे व प्रशांत नायडू उपस्थित होते. यावेळी वंचितच्या उमेश बेंडेकर, निखील गेटेवार, सफल मडके,आदित्य मेश्राम, हर्ष कोचे, मनिष अंबादे, दिपेशु मेश्राम, जय भनारे, हर्ष मडके, प्रतीक रंगारी, प्रणय जुमनाके, सांकेत मेश्राम, सुधीर टेंभूर्णे, हर्ष गुप्ता, ओमकार नेवारे, मयुर लांडे, रोहित ठमके, रोहन वासनिक ,तेजस पटेल, देवेंद्र टाकळीकर, दशरथ सेलोकर या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजपचे कार्यालयीन सचिव दिलीप नागदेवते यांनी कळविले आहे.

हेही वाचा…सरकारवर लोकांचा विश्वास नाही? स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात पुन्हा आंदोलन…

पुढील दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुकही मोर्चेबांधणी करीत आहे. उत्तर नागपूरचे भाजपचे माजी आमदार मिलिंद माने हे या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करीत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर नागपूरमधून काँग्रेस उमेदवाराला आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला या मतदारसंघात अधिक परिश्रम करण्याची गरज आहे. या मतदारसंघात बसपा आणि वंचितची ताकद आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. आता या पक्षाचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi bearers join bjp in nagpur raising concerns over party allegiances cwb 76 psg