वाशीम : जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे. महाविकास आघाडीने मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, कारंजा, वाशीम या चार बाजार समित्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपाला केवळ रिसोड बाजार समितीवर निसटता विजय मिळविण्यात यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना ठाकरे गटानेदेखील आपले नाव अबाधित ठेवले आहे, तर शिवसेना शिंदे गटाचा कुठलाच प्रभाव दिसून आला नाही. जिल्ह्यातील एकूण सहा बाजार समित्यांपैकी पहिल्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी वाशीम व मानोरा बाजार समितीची निवडणूक पार पडली. लगेच दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी जाहीर केलेल्या निकालात वाशीममध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्या शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली. मानोरा बाजार समितीच्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे यांनी एकहाती सत्ता मिळविली. दोन्ही बाजार समित्यांमध्ये भाजपाची स्थिती निराशाजनक राहिली.

हेही वाचा – “राज्यातील ८ कोटी जनतेला मोफत उपचार देणार”, फडणवीसांनी दिली माहिती; जाणून घ्या नेमकी योजना कोणती?

उर्वरित रिसोड, मालेगाव, कारंजा आणि मंगरूळपीर बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी ३० एप्रिलला मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लगेच मत मोजणी सुरू झाली. रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आले. यामधे मंगरूळपीर येथे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुभाष ठाकरे व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या शेतकरी सहकार आघाडीने १८ पैकी १७ जागा ताब्यात घेत भाजपाला धूळ चारली. कारंज्यात राष्ट्रवादीचे नेते स्व. प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई ताई डहाके यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी १८ जागेवर विक्रमी विजय मिळविला.

येथेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी व माजी मंत्री स्व. बाबासाहेब धाबेकर यांच्या महाआघाडीचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांचा गड असलेल्या मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महविकास आघाडी व मित्र पक्षाच्या आघाडीने १८ पैकी १७ जागा ताब्यात घेऊन आपले गड राखले. रिसोड येथील मात्तबर नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भाजपामध्ये प्रवेश घेतला. राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा रिसोड येथे बाजार समितीच्या निवडणुकीआधी मोठ्या थाटात पार पडली. मात्र त्यांची जादू या निवडणुकीत दिसली नाही. रिसोड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे नेते माजी आमदार विजय जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या खासदार भावना गवळी, सहकार नेते वामनराव देशमुख यांची साथ माजी मंत्री देशमुख यांना असतानाही १८ पैकी १० जागांवर त्यांच्या आघाडीला यश आले.

हेही वाचा – महाराष्ट्रदिनी मोठा घातपात घडवण्याची होती योजना! अबुझमाडवरून दोन दिवसांपूर्वीच परतला कुख्यात ‘बीटलू’

बाजार समित्यांच्या निवडणुकीत प्रथमच वंचीत बहुजन आघाडीने उडी घेत मालेगाव, रिसोड आणि वाशीम बाजार समितीमध्ये वंचीतचे नेते डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. सहाही बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धोबीपछाड दिली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचा कारंजा मानोरा विधानसभा गड असूनही त्यांना दोन्ही ठिकाणी अत्यंत निराशाजनक पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची धुरा वजनदार नेत्या खासदार भावना गवळी यांच्या खांद्यावर आहे. मात्र त्यांच्याही आघाडीला मतदारांनी नाकारले असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांवर महविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi entry in market committee elections in washim a blow to bjp while mahavikas aghadi retained its stronghold pbk 85 ssb
Show comments