अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली आहे. वंचितने खामगाव येथील प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना उमेदवारी जाहीर केली. वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. भाजपने विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली. महाविकास आघाडीकडून काँग्रेस ही जागा लढवणार आहे. मात्र, काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसकडून डॉ. सुनील देशमुख, डॉ. सुधीर ढोणे यांच्यासह सहा ते सात नावे चर्चेत आहे. भाजपकडून उमेदवारी दाखल करण्याची धामधूम सुरूअसताना काँग्रेसने उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलेला नाही. दरम्यान, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून प्रा. डॉ. अनिल ओंकार अमलकार यांचे नाव जाहीर केले. अनिल अमलकार हे खामगाव येथील असून त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत. ते कुणबी समाजाचे आहेत. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात भौगोलिकदृष्ट्या मोठे क्षेत्र येत असून पाच जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. या मतदारसंघासाठी दरवेळेस नव्याने मतदार नोंदणी होते. गेल्या काही महिन्यांपासून इच्छुकांनी मतदार नोंदणीवर भर दिला. तरीदेखील गेल्या वेळेस पेक्षा कमी मतदार नोंदणी झाली आहे. भाजपने मतदार नोंदणीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. काँग्रेसमधील इच्छुकांनीदेखील नोंदणीसाठी जोर लावला आहे.
हेही वाचा >>> शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज
निवडणुकीत चुरस
वंचित आघाडीकडून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्यात आली. वंचितकडून निवडणूक लढण्यासाठी पूर्वतयारी केल्याचे दिसून आले नव्हते. मात्र, वंचित आघाडीकडे परंपरागत मतदार आहेत. त्यामुळे वंचितच्या आगमनामुळे निवडणुकीच्या समीकरणात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पदवीधर निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.