लोकसत्ता टीम
अकोला : देशात विविध ठिकाणी घेतलेल्या जी २० परिषदेसाठी एक लाख १३ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. केवळ जगाचा नेता आहे, हे दाखवण्यासाठी नरेंद्र मोदींनी याचा घाट घातला. त्यात दिसले काय तर नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही. एक लाख १३ हजार कोटी खर्चून नरेंद्र मोदींनी देशाची इज्जत गमावली, अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली.
दिवाळीनंतर देशात हिंसाचार पसरण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली. भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर बुधवारी रात्री आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. पी. जी. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याच्या व्यासपीठावर प्रा.अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, भारिम-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आणखी वाचा-भीम आर्मी ‘या’ चार राज्यात निवडणूक लढणार
पुढे ते म्हणाले, ‘‘देशात जी २० चा इव्हेंट केला गेला. त्यासाठी एक लाख १३ हजार कोटींचा खर्च झाला. त्याचा उपयोग काय झाला? हा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी जगाचे नेते आहे, हे दाखवण्यासाठी हे सर्व केले गेले. त्यामध्ये दिसले काय तर नरेंद्र मोदींना इंग्रजी येत नाही. बायडनसोबत चर्चा करतांना नरेंद्र मोदींनी दुभाषिक ठेवला असता, तर लाज गेली नसती. सनातनवादी हिंदुंनी आत्मकेंद्रीय पंतप्रधान देऊ नये. एक लाख १३ कोटी खर्च करून देशाची इज्जत गेली.’’
नरेंद्र मोदी सर्वात मोठे चोर आहेत. राफेलचे विमान खरेदी करतांना ऑर्डर मिळवण्यासाठी पाच हजार ३०० रुपये कोटी खर्च केल्याचे त्याच्या कंपनीने अंकेक्षण अहवालात नमूद केले आहे. या प्रकरणावर इंडिया आघाडीचे नेते देखील तोंड उघडायला तयार नाहीत. रशियाकडून कच्च तेल स्वस्त दरात खरेदी केले जाते. ते खासगी कंपनींना दिले जाते. महागडे तेल आपल्याला पुरवठा करणाऱ्या तीन भारतीय कंपन्यांना दिले जाते. ५० टक्के फरक आहे. त्यातला किती वाटा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातो, हे विचारण्याची गरज आहे. या मुद्द्यावर विरोधकही मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केला.
आणखी वाचा-भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद,कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांची भेट
दिवाळीनंतरचा काळ अत्यंत वाईट राहील. भाजप व संघाला कुठल्याही परिस्थितीत निवडणुका जिंकायची आहे. हिंसाचाराची परिस्थिती भारतात येणार नाही, याची काळजी हिंदू व मुसलमानांनी घेण्याची आवश्यकता आहे. महागाई प्रचंड वाढेल. उनाड मुलाप्रमाणे नरेंद्र मोदींनी देशाचे पैसे उडवले आहेत. नरेंद्र मोदींनी पक्षाची भूमिका बजावली, देशाची नाही. येणारा काळ कठीण असेल. अनेक ठिकाणी दंगली होण्याची शक्यता आहे. हे थांबवायचे असेल तर संघ व भाजपच्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले.
५०० रुपयांची नोट बंद केली जाईल
निवडणूक जवळ आली की एक नोट बदलली जाते. आता मोठी नोट ५०० ची आहे. ती बंद करून सर्वांना गुंतवले जाईल आणि निवडणुका घेतल्या जातील. इंडिया काढून भारत टाकण्यासाठी नव्या नोटा छापल्या जातील. लोकांना अडचणीत टाकणारे भाजपचे फंडे आहेत, अशी टीका करून ५०० च्या नोटा असल्यास त्या २०० च्या किंवा १०० च्या करून घ्या, असे आवाहन ॲड. आंबेडकरांनी केले.
पंतप्रधानरुपी तांत्रिक-मांत्रिकला खाली खेचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तांत्रिक-मांत्रिक आहेत. भारतातील मतदारांकडे सुद्धा मतदानरुपी विद्या आहे. त्याचा वापर करून त्या तांत्रिक-मांत्रिकला खाली खेचा, असे जाहीर आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केले.