बुलढाणा:  वंचित बहुजन आघाडीच्या  दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना काल मंगळवारी ( दिनांक २५) रात्री उशिरा घडली. त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळी झाडण्यात आली तर लोखंडी रॉड ने कार चे काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्राणघातक हल्ल्यातून हे दोघे बचावले आहे.  काल रात्रीच्या या थरारक घटना क्रमामुळे जळगाव जामोद तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या हल्ल्यामागे हल्लेखोरांचा नेमका हेतू काय याचा पोलीस कसोशीने तपास करीत आहे.

 वंचित बहुजन आघाडीतर्फे आज बुधवारी ( दिनांक २६) राजश्री शाहू महाराज यांची दिडशेवी जयंती विविध उपक्रम द्वारे साजरी करण्यात येत आहे. याच्या नियोजनात वंचित आघाडीचे पदाधिकारी गुंतले असताना ही घटना घडली. पंचविस जून रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास वंचितचे सक्रिय पदाधिकारी सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे हे( एम एच २८ ए एस २९५० क्रमाकाच्या) चारचाकी गाडीने जेवायला  जात होते. दरम्यान आसलगाव ते खांडवी गावादरम्यान अज्ञात हल्लेखोरांकडून त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या थरारक घटनाक्रमात अज्ञात हल्लेखोरांनी   कार वर गोळी झाडल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले . तसेच लोखंडी रॉड ने काच फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला .

हेही वाचा >>>“लोकशाहीचा अपमान करणाऱ्या संविधान विरोधकांच्या विरोधातील लढा तीव्र करा,” सुधीर मुनगंटीवार यांचे आणीबाणी निषेध सभेत आवाहन

दरम्यान वंचितच्या  पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सुनील बोदडे आणि प्रकाश भिसे हे दोघे गाडीने नांदुरा येथे जेवण करण्यासाठी जात होते. त्यापूर्वी त्यांनी नाश्ता केला. या दरम्यान, आसलगाव ते खांडवीदरम्यान  वाहनवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हल्लेखोरांपैकी एकाने गाडीच्या काचावर रॉडने हल्ला केला तर दुसऱ्याने गोळी झाडल्याचे त्यांनी सांगितले. घटनेनंतर हल्लेखोर तत्काळ जळगाव कडे  फरार झालेत. यामुळे भयभीत झालेल्या पदाधिकाऱ्यांनी याची माहिती जळगाव  पोलिसांना दिली. याची दखल  घेऊन पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. हल्लेखोरांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून दोघे पदाधिकारी सुखरूप वाचले  असून, त्यांना पोलिसांनी तत्काळ पोलिस स्टेशनला रवाना केले.  त्यांचे वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.  ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा >>>नागपुरातील’ हिट अँड रन ‘ प्रकरणात आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने नाकारला…

पोलिसही चक्रावले

दरम्यान या थरारक घटनाक्रमामुळे जळगाव जामोद पोलीस देखील चक्रावून गेल्याचे चित्र आहे. यामुळे तपासात हल्लेखोरांचा हेतू काय, नेमके कारण काय? याचा उलगडा सखोल तपास अंतीच होणार आहे. गोळीबार संदर्भातील अहवाल जळगाव जामोद पोलिसांना प्राप्त झाल्यावर या हल्ल्याची तपशीलवार माहिती हाती येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रकाश भिसे म्हणतात कुणाशी वैर नाही

दरम्यान यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रकाश भिसे यांनी आपल्यावर हल्ला का करण्यात आला हे सांगण्यास असमर्थता दर्शविली. आपले कुणाशी वैर नाही. तसेच वंचित आघाडीचे काम करीत असलो तरी इतर सर्व पक्षाच्या नेते, पदाधिकारी यांच्या समवेत चांगले संबंध आहेत. त्यामुळे राजकीय वैमनस्याचा विषयच नसल्याचे भिसे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader