यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने या पक्षाला निवडणुकीपासून वंचित राहायची वेळ आली. वंचितची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. अखेर वंचित बहुजन आघाडी समनक जनता पार्टीचे उमेदवार डॉ. अनिल जयराम राठोड यांना पाठींबा देत असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी जाहीर केले.
वंचित बहुजन आघाडीने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे कारण देत उमेदवार बदलवून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली. अभिजित राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र छाननीत त्रुटींमुळे त्यांचा अर्ज बाद झाला. या निर्णयाविरोधात अभिजित राठोड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिकाही खारिज झाली. त्यामुळे वंचित यावेळी निवडणुकीच्या रिंगणातून पूर्णपणे बाहेर आहे. वंचित लढतीतून बाहेर पडल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडला होता.
हेही वाचा – “मोदींची जाण्याची वेळ आली, म्हणूनच ते…” उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले…
२०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाखाच्या जवळपास मते घेतल्याने वंचितची मते यावेळी कोणाला जाणार, हा प्रश्न निर्माण झाला होता. वंचितच्या उमेदवाराचा फायदा महायुतीस झाला असता. वंचित रिंगणात नसल्याने ही उणीव बसपाचा उमेदवार भरून काढण्याची शक्यता आहे. तरीही वंचित काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर वंचितने समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल जयराम राठोड यांना पाठींबा घोषित केला. वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे वंचितच्या एकनिष्ठ मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी वंचित निवडणुकीत प्रभावी कामगिरी करणार नसल्याचे राजकीय जाणकार सांगतात. अशा परिस्थितीत वंचितने एकदम नवख्या पक्षास आणि उमेदवारास पाठींबा दिल्याने फार फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे. वंचितची बहुतांश मते यावेळी महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र वंचितने अधिकृतपणे अन्य पक्षास पाठींबा दिल्याने त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय निघतील, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा – नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
समाजातील शोषित, पीडित आणि सत्तेपासून वंचित समुहाला राजकीय प्रवाहात सहभागी करण्यासाठी व ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची चळवळ गतीमान करण्याच्या सकारात्मक विचाराने वंचित बहुजन आघाडीतर्फे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समनक जनता पार्टीचे उमेदवार डॉ. अनिल जयराम राठोड यांना जाहीर पाठींबा देत असल्याची प्रतिक्रिया वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी दिली.