अकोला : वंचित बहुजन आघाडीने शहरात वारंवार फलकबाजी करून लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम सुरू केली आहे. आता वंचित आघाडीने अकोलेकरांच्या नावावर फलकबाजी करून ‘मविआ’वर निशाणा साधला. बैठकीपासून दूर का ठेवल्याचा सवाल फलकांवरून करण्यात आला आहे. या फलकांची राजकीय वर्तुळात चर्चा असून वंचित व ‘मविआ’तील कटुता वाढण्याची चिन्हे आहेत.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतांना अद्यापही वंचितचा ‘मविआ’तील समावेशाचा मुद्दा स्पष्ट झालेला नाही. वंचित आघाडीने ‘मविआ’तील नेत्यांपुढे काही मुद्दे मांडलेत. त्यावर ‘मविआ’कडून उत्तर आलेले नाही. तिढा कायम असून आघाडीचा मुद्दा रेंगाळत आहेत. त्यामुळे वंचित आघाडीत देखील अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, अकोला शहरात काही फलक झळकले आहेत.
हेही वाचा…अकोल्यात भाजपच्या उमेदवारीत धक्कातंत्र ?
‘महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, तर २ फेब्रुवारीपासून २७ फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून वंचितला दूर का ठेवले? याचे उत्तर द्या, वंचित बहुजन आघाडी जर महाविकास आघाडीचा भाग असेल, तर अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा का जाहीर केला नाही? काँग्रेस या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी का करत आहे?, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हारणाऱ्या २ जागा का देऊ केल्या आहेत?, त्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष गेल्या १५-२० वर्षांपासून जिंकलेल्या नाहीत, त्या जागा वंचित बहुजन आघाडीच्या माथी मारण्याचा का प्रयत्न केला जातोय?,’ असे सवाल फलकांवरून करण्यात आले आहेत.
हेही वाचा…भंडारा-गोंदियातून उमेदवार कोण? एकच चर्चा
त्यावर ‘सवाल अकोलेकरांचे’ असे नमूद करण्यात आले. शहरातील रतनलाल प्लॉट, अशोक वाटिका, बसस्थानक, अकोला पंचायत समिती, नेहरू पार्क, कृषी नगर, अकोला जिल्हा परिषद जवळ हे फलक लागले आहेत. अकोलेकर हे सवाल करीत असल्याचा दावा वंचितने केला.