अकोला : महाविकास आघाडीची जागा वाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे आपल्या ‘एक्स’खात्यावरून जाहीर केले. या अगोदर वंचितने २७ ऐवजी २८ ला बैठक घेण्याची मागणी केली होती. मात्र, वंचितने घुमजाव केला आहे.
‘मविआ’ची महत्त्वपूर्ण बैठक आज होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणच मिळाले नसल्याचा आरोप वंचितने केला होता. त्यानंतर काल ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सभा असल्याने बैठकीत सहभागी होता येणार नाही, ही बैठक २७ ऐवजी २८ ला घेण्याची मागणी केली होती. आज बैठकीत प्रतिनिधी पाठवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. २४ फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह २ फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्चा किंवा कार्यक्रमात महाविकास आघाडीद्वारे वंचित बहुजन आघाडीला सहभागी किंवा आमंत्रित केलेले नसले, तरीही आम्ही महाविकास आघाडीविषयी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – सेल्फीस नकार देत पालकाने मुख्यमंत्र्यांना केला थेट सवाल; काय आहे प्रकरण? जाणून घ्या
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी
महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.