लोकसत्ता टीम
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर चहांदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चहांदे यांनी शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या खरबी, नागपूर ग्रामीण येथील प्रचारसभेत प्रवेश घेतला.
भाजपाचे कन्हानचे माजी नगराध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सभापती शंकर चहांदे यांना वंचित आघाडीने रामटेकची उमेदवारी दिली. या जागेसाठी काँग्रेसमधून बाहेर पडलेले निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये आग्रही होते. परंतु त्यांना वंचितने उमेदवारी दिली नाही. शंकर चहांदे यांच्याना निवडणूक चिन्ह वाटप देखील झाले. त्यानंतर दोन दिवसांनी अचानक वंचित आघाडीने शंकर चहांदे यांना माघार घेण्याचे म्हणजे प्रचार न करण्याचे आणि किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्यास सांगितले. ऐनवेळी माघार घेण्यास सांगितल्याने अपमानित झालेले शंकर चहांदे यांनी काँग्रेसची वाट धरली.
आणखी वाचा-येत्या २४ तासात मुसळधार पावसाची हजेरी, आठवड्याची अखेरही पावसानेच
काँग्रेस नेते आशीष दुवा यांनी चहांदे यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सुरेश भोयर, अवंतिका लेकुरवाळे उपस्थित होत्या.
संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसमध्ये – चहांदे
२०२४ ची लोकसभेची निवडणूक ही फक्त राजकीय सत्ता स्थापन करण्यासाठी नाही तर लोकशाही विरूद्ध हुकुमशाही अशी ही निवडणूक आहे. बाबासाहेबांनी लिहिलेले भारतीय संविधान आज भाजपच्या सत्ताकाळात धोक्यात आले आहे. ज्या पध्दतीने देशभरात भाजपचे दुसऱ्या फळीचे नेते भाष्य करीत आहेत ते बघता जर भाजपची सत्ता आल्यास नक्कीच ते संविधान बदलून देशात हुकुमशाही लादतील. त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश करून महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा देत आहे, असे शंकर चहांदे म्हणाले.