अकोला : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी केली. संभाजी भिडेंचा कार्यक्रम रविवार रात्री अकोला येथे सुरू असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी जुने शहर पोलीस ठाणे गाठले. तसेच भिडेंना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या देण्याची आक्रमक भूमिका घेतली.
अमरावतीमध्ये शुक्रवारी, २८ जुलै रोजी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अपमानजक वक्तव्याबद्दल संभाजी भिडे यांच्यावर अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कलम आय ५३ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अमरावती पोलिसांनी ताब्यात घेणे अपेक्षित होते. मात्र, अकोला येथे आयोजित भिडेंच्या कार्यक्रमासाठी पोलीस सहकार्य करीत असल्याचा आरोप यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला.
अकोला येथे यापूर्वी दंगल घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अशात भिडेंनी शहरात भडकावू वक्तव्य करून जिल्ह्यातील वातावरण खराब केल्यास यास कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली. दरम्यान पोलीस ठाण्यात कार्यकर्ते व पोलिसांत तणावाचे वाातवरण निर्माण झाले होते. आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्रीपर्यंत वंचितचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या मांडून होते.
पोलिसांची दमछाक
संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमामुळे शहरातील बाळापूर मार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप आले हाेते. कार्यक्रमस्थळी जवळपास सर्वच गल्लींच्या मुख्यद्वारावर पोलीस हाेते. गर्दी न हाेण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. भांडपुरा चाैक साेडल्यानंतर काही अंतर ते जुना बाळापूर नाक्यापर्यंत सहा ठिकाणी मुख्य रस्त्यावर पोलीस बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. प्रत्येक ठिकाणी चार ते पाच पोलीस हाेते. कार्यक्रमस्थळी बॅरीगेट्स लावण्यात आले हाेते. पोलीस वाहनेही तैनात करण्यात आली हाेती. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी माेठ्या संख्येने तैनात हाेते.