लोकसत्ता टीम

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत कायमस्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १९ फेब्रुवारी २०२५ पासून नागपूर आणि सिकंदराबाद येथून सुटणाऱ्या गाड्यांसाठी लागू होईल.

यापूर्वी, ही गाडी २० डब्यांसह चालवली जात होती. यामध्ये ट्रेलर कोच विथ पँटोग्राफ, नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच, मोटर कोच आणि ड्रायव्हिंग ट्रेलर कोच हे डबे होते. आता ही गाडी ८ डब्यांची राहणार आहे. या गाडीला मोटर कोच, ट्रेलर कोच आणि नॉन-ड्रायव्हिंग ट्रेलर कोच हे डबे असतील. ज्या प्रवाशांनी आधीच तिकिटे आरक्षित केली आहेत, त्यांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. रेल्वे स्थानकांवर आणि आरक्षण केंद्रांवर सार्वजनिक उदघोषणा प्रणालीद्वारे ही माहिती जाहीर केली जाईल.

नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद असल्याने या गाडीचे डबे २० वरून ८ करण्यात आले आहेत. नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस १६ सप्टेंबर २०२४ पासून सुरु करण्यात आली. गाडी लोकप्रिय होण्यास विलंब लागतो, त्यामुळे सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळत असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु गेल्या महिन्यात तिकीट विक्रीचा आलेख बघता डब्याची संख्या कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे.

देशातील काही निवडक मार्गावर २० डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. त्यात नागपूर-सिंकदराबाद या मार्गाचा समावेश आहे. आता ही गाडी ८ डब्यांची करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे डब्यांची संख्या तिकीट विक्रीच्या आधारे ठरविल्या जाते. काही वंदे भारतच्या डब्यांची संख्या २० वरून ८ कमी केली जाते तर काही गाड्यांच्या डब्यांची संख्या १६ वरून २० करण्यात आली आहे. गाडी क्रमांक २०१०१/०२ नागपूर- सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस मंगळवार सोडून आठवड्यातील ६ दिवस चालवण्यात येत आहे. ही गाडी एकूण ५८५ किमीचे अंतर ७ तास २० मिनिटांत पूर्ण करीत आहे.

असे आहे वेळापत्रक

नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस नागपूर दररोज सकाळी ५ वाजता सुटल्यानंतर सिकंदराबाद येथे दुपारी १२.१५ वाजता पोहोचते. नागपूर येथून सुटल्यानंतर ही गाडी सेवाग्राम- ५.४३ वाजता, चंद्रपूर ७.०३, बल्लारशहा-७.२०, रामागुंडम ९.०८, काजीपेठ- १०.४ वा वाजता, तर सिकंदराबाद येथे दुपारी १२.१५ वाजता पोहोचते. २०१०२ वंदे भारत सिकंदराबाद येथून दुपारी १ सुटल्यानंतर रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचते. ही गाडी काजीपेठ ०२.१८ वाजता, रामागुंडम ०३.१३, बल्लारशहा ०५.२५, चंद्रपूर ०५.४० वा., सेवाग्राम ०७.१३, तर नागपूर स्थानकावर ही गाडी रात्री ८.२० वाजता पोहोचते.

Story img Loader