लोकसत्ता टीम
नागपूर: चेन्नई येथील कोच फॅक्टरीमधून आज नागपुरात नारंगी रंगाची १६ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस गाडी दाखल झाली आहे. नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला १६ सप्टेंबरला दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवी झेंडी दाखवणार आहे.
ही गाडी मंगळवार वगळता दररोज धावणार आहे. सध्या नागपूरला पोहोचण्यासाठी या प्रवासाला ८ तास लागतात. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसला ७ तास १५ मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघेल आणि दुपारी १२.१५ ला सिकंदराबादला पोहोचेल. या गाडीला सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस परतीच्या प्रवासात सिकंदराबादपासून दुपारी १ वाजता निघेल आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचेल.नागपूर-बिलासपूर आणि नागपूर ते इंदूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू आहे. आता नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस करण्याचे नियोजन आहे. येत्या १६ सप्टेंबरला ही गाडी सुरू होणार आहे.
हेही वाचा >>>नागपूर: एसटीने निघाले अन् पुरात अडकले
ही चर्चा सुरू झाल्यानंतर नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. परंतु नागपूर ते पुणे हे अंतर बघता चेअर कार असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करणे सोयीचे नसल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावर येत्या काळात स्लीपर क्लास असलेली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु या मार्गावरील प्रवाशांची गर्दी बघता तूर्तास रेल्वेने सुपर फास्ट विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-पुणे सुपर-फास्ट एसी स्पेशल २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रत्येक शनिवारी नागपूरहून सायंकाळी ७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. पुणे-नागपूर सुपर-फास्ट एसी स्पेशल रविवारी २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान पुण्याहून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
हेही वाचा >>>‘समृद्धी’वरील उत्तररात्रीचा थरार…काय घडले?
एलटीटी-नागपूर- एलटीटी स्पेशल
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) -नागपूर सुपर-फास्ट स्पेशल ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी एलटीटीवरुन रात्री १२.२५ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. नागपूर-एलटीटी सुपर-फास्ट स्पेशल दर शुक्रवारी १ ते ८ नोव्हेंबर दरम्यान नागपूरवरून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता एलटीटीला पोहोचेल.
नागपूर-समस्तीपूर-नागपूर स्पेशल
नागपूर-समस्तीपूर सुपर-फास्ट स्पेशल ३० ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी सकाळी १०.४० वाजता नागपूरहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता समस्तीपूरला पोहोचेल.
समस्तीपूर-नागपूर सुपर-फास्ट स्पेशल ३१ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी समस्तीपूरहून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचेल.