नागपूर: ग्राहकांकडून एकीकडे अवास्तव वीज देयकावर संताप व्यक्त होतो, दुसरीकडे मात्र शासन वीज दरवाढ झाली नसल्याचे सांगते. जय विदर्भ पार्टीतर्फे सोमवारी (२२ जुलै) ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापुढे वीज दरवाढीविरोधात  निदर्शने करण्यात आली. सर्वाधिक वीज निर्मिती विदर्भात होत असतांना येथे वीजेचे दर अधिक का? हा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय विदर्भ पार्टीच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी- कार्यकर्ते गांधी पुतळ्यापुढे एकत्र आले. आंदोलकांनी यावेळी रस्त्यावर ‘दिल्लीत आहे वीज स्वस्त – विदर्भाची जनता मात्र दरवाढीने त्रस्त’, ‘मागे घ्या, मागे घ्या – वीज दरवाढ मागे घ्या’, ‘वीज बिलाला लागली आग – कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग’, ‘कर कर्जा नही देंगे – बिजलीका बिल नही देंगे’, ‘उर्जामंत्री – हाय हाय’, ‘महाराष्ट्र सरकार – मुर्दाबाद’ चे नारे दिले.

हेही वाचा >>>आनंदवार्ता.. पाचदिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण.. हे आहेत आजचे दर..

आंदोलक म्हाणाले, सर्वाधिक वीज विदर्भात तयार होते. त्याकरीता जमीन, पाणी, कोळसा व इतरही संसाधने विदर्भाची वापरली जातात. त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील नागरिकांमध्ये कर्करोग, श्वसनासह इतरही आजार वाढत आहे. त्यानंतरही येथे तयार होणारी वीज महाग दरात येथील नागरिकांना खरेदी करावी लागते. उलट ही वीज मुंबईला पाठवून येथील दरातच त्यांना उपलब्ध कली जाते. विदर्भात वीज निर्मितीचा सरासरी दर २.५० रुपये आहे. परंतु त्यावर वहन आकार १ रुपया १७ पैसे प्रती युनिट, इंधन समायोजन आकार ८० पैसे प्रती युनिट, स्थिर आकार १३० रुपये प्रती वीज ग्राहक, वीज शुल्क १६ टक्के दराने लादल्याने वीज बिलात १ एप्रिल २०२४ पासून अतोनात वाढ झाली. ही दरवाढ करतांना महावितरण ६७ हजार ४४४ कोटी रुपयांनी तोट्यात असल्याचे सांगते. परंतु ही वीज इतरत्र वाहून नेली जात असल्याने विदर्भात स्वस्त करून इतर भागातून थोडे जास्त दर घेण्याएवजी तेथेही विदर्भाएवढेच दर घेतले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. वीजेचे दर कमी न केल्यास तिव्र आंदोलनाचा इशाराही जय विदर्भ पार्टीचे उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी दिला. याप्रसंगी पक्षाचे अरुण केदार, गुलाबराव धांडे, सुधा पावडे, नरेश निमजे, श्रीकांत दौलतकर, भोजराज सरोदे, राजेंद्र सतई, ज्योती खांडेकर, रवींद्र भामोडे, अशोक पाटील, प्रशांत नखाते, अमूल साकुरे, रमेश वरुडकर यांच्यासह इतरही पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेट्रोलच्या धर्तीवर वीजेचे दर निश्चिती का नाही?

पेट्रोल व डीझेल च्या रिफायनरी मुंबई, बृहन्मुंबई व ठाणे जवळ असल्याने तेथील ग्राहकांना वहन शुक्लामध्ये कपात करत पेट्रोलचे दर ६५ पैस्यांनी व डीझेलचे दर २ रुपये ६ पैश्यांनी कमी करून तेथील स्थानिक जनतेला दिलासा दिला जातो. तर वीज निर्मितीमध्ये अग्रणी असलेल्या विदर्भातील जनतेला वहन आकार नि:शुल्क करून दिलासा का दिला जात नाही? असा प्रश्नही पक्षाचे अध्यक्ष अरुण केदार यांनी उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Variety chowk in nagpur city protesting against electricity billrate hike nagpur mnb 82 amy