अकोला : गुलाबी थंडीच्या दिवसांत आकाशात विविध नजाऱ्यांची उधळण अनुभवता येणार आहे. या अनोख्या उत्सवात सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
चांद्रमासात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला चंद्र त्या संबंधित नक्षत्राच्या जवळ असतो. या कार्तिक पौर्णिमेला चंद्र सहा ताऱ्यांनी एकत्रित बनलेल्या कृतिका नक्षत्रात पाहता येईल. निरभ्र आकाशात शनिवारी सायंकाळी पूर्व क्षितिजावर गुरु-चंद्र एकमेकांजवळ तर आकाश मध्याशी शनी ग्रह व पश्चिमेस बुध ग्रह बघता येईल. यावेळी पश्चिम ते पूर्व आकाशात अनुक्रमे धनु, मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ या सहा राशी दिसतील. दर दोन तासांनी एकेका राशीचा उदय पूर्वेस तर अस्त पश्चिमेस होत असतो. मध्यरात्रीच्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदित होणारे मृग नक्षत्र पहाटे पश्चिमेस येत असून यावेळी मृग नक्षत्रातील लाल रंगाची काक्षी, व्याध ही सर्वात तेजस्वी तारका आणि प्रश्वा या तीन ताऱ्यांचा समभूज त्रिकोण पाहता येईल. तसेच प्रश्वा व गोमेईझा आणि मिथुन राशीतील ‘कॅस्टर’ व ‘पोलूक्स’ या चार ताऱ्यांच्या समांतरभूज चौकोनास आकाशातील स्वर्गव्दार अर्थात चंद्र, सूर्य आणि ग्रहांचा भ्रमणमार्ग बघता येणार आहे.
हेही वाचा – ‘पनवती’ शब्दाचा संबंध मोदींशी का जोडता? पटोलेंचा भाजपाला सवाल, म्हणाले..
याचवेळी पहाटेला दक्षिण आकाशात विविध रंगांचा तारा अगस्ती आणि पूर्व आकाशात सर्वात तेजस्वी ग्रह शूक्र व उत्तर आकाशात सप्तर्षी व एकाच ठिकाणी दिसणारा धृवतारा बघावा. अवकाश प्रेमींसाठी ही अनोखी पर्वणी असून ते अनुभवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.