अकोला: पाऊसगीतं, गद्य उतारे आणि कविता यांची एकत्र गुंफण असणारा सुरेख पावसाक्षरं कार्यक्रमातून पावसाची विविध रूपे उलगडली. अक्षरा वाचन संस्कारच्यावतीने लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित कार्यक्रमात रसिकांना चिंब केले.
आरती प्रभू यांच्या ‘येरे घना’ या सुरल गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मेघांचे विविध प्रकार, पावसाची प्रतीक्षा, पावसाचा रंगमंच, पहिला पाऊस, पावसाचं वय, पावसाचा आध्यात्मिक स्पर्श, पावसाचे लोक संदर्भ, मनसोक्त निथळणारा पाऊस, नवरा बायकोचा पाऊस, घरादाराची दैना करणारा पाऊस, तसंच पाऊस आणि भजे यांचा संबंध असे अनवट प्रकारावर दमदार सादरीकरण करण्यात आले.
सोबतीला सुरेख, सुंदर देखणे असे छायाचित्र आणि चलचित्र प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. पु. लं. देशपांडे, मुकुंद कुळे, डाॅ. रामचंद्र देखणे, अरुणा ढेरे, राजनखान, श्याम पेठकर, ना.धों. महानोर यांच्या गद्यवेच्यांचे वाचन तर डॉ. विठ्ठल वाघ, सौमित्र, कुसुमाग्रज, गजेंद्र अहिरे, ऐश्वर्या पाटेकर, श्रुती राजे, नितेश घोडबे, सुषमा देशपांडे आणि डाॅ. विजया खांडेकर यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. आला आला वारा, अधीर मन झाले, हसरा नाचरा श्रावण, बहरून फुलला प्राजक्त दारी आणि नभ उतरू आलं, या गाण्यांनी कार्यक्रमात बहर आणला.
हेही वाचा… नोकरीसाठी क्युआर कोडद्वारे पैशाची मागणी; महामेट्रोने केला खुलासा
नवोदित कलाकारांनी सादर केलेला हा कार्यक्रम रसिकांच्या मंत्रमुग्ध करून गेला. भक्ती बिडवई, अश्विनी गोरे, भाग्यश्री केळकर, पल्लवी सबनीस, वंदना मोरे, कांचन गावंडे, अंजली अग्निहोत्री, मनीषा नाईक, कविता धोटे, स्वाती पिंपरकर, मेधा माळपांडे, अलका बाजरे यांनी सादरीकरणात सहभाग घेतला. कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन सीमा शेटे यांनी केले, तर कवितांची निवड स्वाती दामोदरे यांनी केली. कार्यक्रमासाठी कल्पक तांत्रिक सहाय्य मोहिनी मोडक यांनी दिले. त्यासाठी छायाचित्र अविरत शेटे यांनी उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा राव यांनी केले होते, तर आभार विं.दा. फाटक यांनी मानले.