यवतमाळ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रती सहवेदना आणि शासनाच्या शेतकरी धोरणांचा निषेध म्हणून आज मंगळवारी महाराष्ट्रासह देशात आणि जगात विविध ठिकाणी भूमिपूत्र, शेतकरी हितचिंतकांनी एक दिवस अन्नत्याग केले. यवतमाळ येथे आझाद मैदानात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर विविध सामाजिक, शेतकरी संघटना, विद्यार्थी, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येत सकाळी ११ वाजतपासून अन्नत्याग सुरू केले.३८ वर्षांपूवी आजच्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी आपली पत्नी, मुलाबाळांसह पवनार (जि. वर्धा) येथील आश्रमात सामूहिक आत्महत्या केली. तेव्हापासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय झाला असताना, शासनाने अद्यापही शेतकरी विरोधी धोरणांत बदल केले नाही.
हेही वाचा >>> यवतमाळ : ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’! महायुतीचे काही ठरेना; उद्धव ठाकरेंची प्रचारात आघाडी, भावना गवळी…
देशातील पहिली शेतकरी कुटुंब आत्महत्या संबोधली गेलेली करपे कुटुंबाची आत्महत्या १९८६ ला झाली. व्यवस्थेने सुरू केलेली शेतकऱ्याची अवहेलना थांबवावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून राज्यभर १९ मार्चला एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाते. शेतकरी नेते अमर हबीब यांच्या नेतृत्वात किसानपुत्र आंदोलनाने या आंदोलनाची सुरूवात केली. अमर हबीब यांनी आठ वर्षांपूवी साहेबराव करपे यांच्या मूळगावी चिलगव्हाण (ता. महागाव) येथे या आंदोलनाची प्रत्यक्ष सुरूवात केली. त्यानंतर मुंबई, दिल्ली आदी ठिकाणी त्यांनी आंदोलन केले. हबीब यांच्या पुढाकाराने सुरू झालेले हे आंदोलन आता शेतकरीपुत्र १९ मार्चला जगभर करतात. आज यवतमाळ येथील आझाद मैदानातसुध्दा शेकडोंनी एकत्र येऊन करपे कुटुंबाला श्रध्दांजली वाहिली आणि शेतकऱ्यांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थितांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. महागाव तालुक्यातही आंदोलन करण्यात आले. चिलगव्हाणमध्येही नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. या प्रसंगी मनीष जाधव, अनुप चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या कलावती बांदुरकर, प्रा.घनश्याम दरणे, प्रा.सीमा शेटे, प्रा.प्रवीण भोयर, अशोक भुतडा यांच्यासह शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा घेऊन सायंकाळी ५ वाजता या आंदोलनाची सांगता झाली.