लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जर संतप्त होत कडक कारवाई करण्याचे आदेश उपस्थितंसमोर देत असतील तर प्रकरण निश्चितच गंभीर असणार. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वरूण पाठक हे आपल्या सहकाऱ्यासोबत फडणवीस यांना प्रत्यक्ष जाऊन भेटले. वर्धा जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेती चोरी होत आहे. त्याला पायबंद घालावा अशी लेखी मागणी या भेटीत करण्यात आली. तेव्हा फडणवीस यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना त्याचवेळी थेट फोन लावला. रेती माफियावर कठोर कारवाई करा. प्रसंगी मोक्का लावा पण सोडू नका, असे आदेश फडणवीस यांनी लगेच दिल्याचे पाठक म्हणाले.

या वेळी रेती चोरीबाबत माहिती देण्यात आली. शासनाने नावे रेती धोरण अंमलात आणले. त्यानुसार बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सहाशे रुपये प्रती ब्रास रेती मिळणे अपेक्षित आहे.मात्र त्यापेक्षा अधिक दर आकारल्या जात आहे. सध्या अवैधपणे मोठ्या प्रमाणात रेती उपसा हिट आहे. ही चोरीची रेती सहा हजार रुपये प्रती ब्रास अश्या दराने उपलब्ध आहे. हा काळाबाजार सरसकट सूरू असून अवैध कमाई करण्यासाठी ओव्हर लोडींग केल्या जाते. दोन ब्रास रेतीचा परवाना असला तरीही चार ब्रास रेती उपसा होतो. या चोरीकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे उघड दिसून येते. बाजारात उपलब्ध ही चोरीची रेती बांधकाम धारकांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे भुर्दंड पडत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणण्यात आले.

आणखी वाचा-अमरावती विभागात सोयाबीन उत्‍पादकही संभ्रमावस्‍थेत, बियाणे महागले; उगवण क्षमता…

ज्या रेती वाहून नेणाऱ्या वाहनाची नोंद महसूल अधिकाऱ्या कडे झाली असते, अश्या गाड्यांना सोडून दिल्या जात आहे. रेती डेपोच्या आडून थेट नदी पत्रातून बोटीत व पोकलंड टाकून उपसा सुरू आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये किमतीची रेती चोरी होत आहे. नदीपात्र भकास होत चालले आहे. याविषयी प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत.मात्र दखल घेतल्या गेली नाही. उलट रेती माफिया दादागिरी करतात. तक्रार केल्यास नदीपात्रात गाडून टाकण्याच्या धमक्या मिळतात. त्यामुळे गावकरी पण या माफियांच्या दहशतीत जगत आहेत. याला वेळीच आवर बसला पाहिजे, अशी विनंती युवा नेत्यांनी केली. त्याची तात्काळ दखल घेत गृहमंत्री फडणवीस यांनी मोक्का लावण्याची सूचना केल्याचे पाठक यांनी सांगितले. युवा मोर्चाचे पृथ्वीराज शिंदे, अनिकेत भोयर, शिवानी दाणी, सचिन भोयर हे उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun pathak demanded from devendra fadnavis to action against corrupt officials in sand theft pmd 64 mrj
Show comments