वाशीम : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात अचानक बदल झाला आहे. कधी रिमझिम पाऊस, कधी ढगाळ वातावरण तर कडक ऊन पडतं असल्याने सर्दी, ताप, खोकल्यासह साथरोग बळावले आहेत. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे आजाराकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणून येत आहेत. कधी भरपूर पाऊस तर कधी कडक ऊन अशी स्थिती आहे. या होणाऱ्या बदलांमुळे जिल्ह्यात साथीच्या आजारात वाढ होताना दिसून येत आहे. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस यामुळे वातावरणात सतत बदल होत आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. शहरी व ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुलांनाही घशात खवखव होणे, कान, नाकाच्या आजारांसह सर्दी, खोकला आणि तापासारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आजाराकडे दुर्लक्ष न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.