लोकसत्ता टीम
अकोला : अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर व जुने शहरातील ३१९ वर्षे पुरातन विठ्ठल मंदिरात वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची सूचना भाविक-भक्तांना मंदिरातील फलकांवरून देण्यात आली आहे.
राज्यातील विविध देवस्थानांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. देवस्थानांमध्ये असभ्य वस्त्र परिधान करून भाविक येत असल्याचा प्रत्यय वारंवार आला. त्यावर रोख लावण्यासाठी देवस्थानांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली. मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी वस्त्र संहिता आवश्यक असल्याचे हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे आहे.
आणखी वाचा-सेवाग्राम आश्रमातील ‘आखरी निवास’ पर्यटकांसाठी खुले
शासकीय कार्यालयात वस्त्र संहिता लागू असून, धार्मिक, प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस ठाणे आदी क्षेत्रांत वस्त्र संहिता लागू असल्याचे हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे आहे. मंदिरांमध्येही वस्त्र संहिता असावी, असे महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे काही दिवसांपूर्वी जाहीर मत व्यक्त करण्यात आले होते. देशातील काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये तर अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्र संहिता लागू आहे. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्ती स्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, मात्र, मंदिर हे धार्मिकस्थळ असून, पावित्र्य जपणे आवश्यक असल्याचे हिंदुत्ववाद्यांचे मत आहे.
दरम्यान, अकोलेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिर आणि जुने शहरातील पुरातन श्री विठ्ठल मंदिरात वेशभूषेबाबत फलक लावण्यात आले आहेत. अंगप्रदर्शन करणारी वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करू नये आणि भारतीय संस्कृतीचे पालन करून सात्विक वेषभूषेतच दर्शन घ्यावे, असे विनंती करणारे फलक मंदिरामध्ये लावण्यात आले आहेत.