वर्धा : निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सीजन पार्क येथे आज सकाळपासून महिलांची हजेरी लागली. वट सावित्रीचे निमित्त साधून वड व अन्य अनेक वृक्षांचे रोपण करण्यात आले. वडाला प्रदक्षिणा घालून नव्हे तर त्याचे रोपटे लावून महिलांनी सुखी संसाराची कामना केली.
कीर्तनकार भाऊ थुटे यांनी वट सावित्री हे निसर्ग पूजनाचे प्रतीक म्हणून साजरा करावा असा सण होय. फांद्या तोडून ते भंग करू नये. वड हे झाड बिया रुजवून उगवत नसून त्याच्या फळातील बिया पक्ष्यातील विष्ठेतून बाहेर पडल्यावर त्या रुजतात. पूर्वी या झाडाच्या आश्रयास वाटसरू थांबत. व्रताच्या निमित्ताने त्याचे पूजन व जतन व्हावे.
समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी नमूद केले की समृध्दी मार्गावर कंत्राटदाराने कशिया, गुलमोहोर अशी अल्पजीवी झाडे लावली. आम्ही समितीतर्फे त्यांना सीता अशोक, कनक चाफा, अमलतश, उंबर अशी झाडे लावण्याची विनंती करीत त्याची रोपटी पुरविण्याची खात्री दिली. मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे खेदपूर्वक सांगितले. या कार्यक्रमात ईहा देशमुख हिचा वाढदिवस व्रुक्ष लावून साजरा करण्यात आला. तसेच शोभा बेलखोडे, डॉ.मेघा लांडगे, शीतल बाभळे, मनीषा भगत, विद्या भोयर, सुरेखा थूटे, अनिता शिंदे, विजयश्री साळुंखे, जयश्री वाकडे, वनिता देशमुख, वैष्णवी देशमुख, शोभा राऊत आदींनी सणा निमित्त वृक्षारोपण केले. नीर, नारी, नदी हेच नारायण नारायण असा जागर झाला.