नागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने (वेकोलि) नागपूर जिल्ह्यातील दहेगाव मकरधोकडा ही कोळसा खाण स्पर्धात्मक बोलीत मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे वेकोली ही कोल इंडियाची स्पर्धात्मक बोलीत कोल ब्लाॅक मिळवणारी पहिली उपकंपनी ठरली आहे. या खाणीमुळे वेकोलीला कोळशाचे उत्पादन वाढवण्यास मदत मिळणार आहे.

केंद्र सरकारने कोल ब्लॉकचे गैरप्रकार टाळण्यासाठी आता प्रत्येक नवीन कोल ब्लॉक स्पर्धात्मक बोलीतून ई- निविदा पद्धतीतून देण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून सरकारी कंपन्यांना ब्लॉक मिळण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. जुन्या कोल कंपनीकडील खाणीतील कोळसा आता खूप कमी शिल्लक आहे.दरम्यान, खासगी कंपनीच्या फायद्यासाठी कोल ब्लॉक स्पर्धात्मक बोलीतून खासगीला देण्याचा घाट असल्याचाही आरोप कामगार संघटनेकडून केला जातो. त्यातच एक सकारात्मसक बातमी पुढे आली आहे. त्यानुसार वेकोलीकडे नवीन कोल ब्लॉक आला आहे.

मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएसटीसी)तर्फे नागपूर जिल्ह्यातील दहेगाव मकरधोकडा या कोळसा खाणीची स्पर्धात्मक बोलीसाठीची ई-प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात ही खाण मिळवण्यात वोकोलि कंपनीला यश मिळाले आहे. ही खाण नागपूर जिल्ह्यातील उमरेड कोळसा क्षेत्रामध्ये आहे. सोबत मकरधोकडा ओपन कास्ट खाण आणि दिनेश (मकरधोकडा) ओपन कास्ट खाणीला लागून आहे. या शेजारच्या खाणीचेही संचालन वेकोलिकडेच आहे. या नवीन खाणीमुळे वेकोलिला कोळसा उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

देशातील वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाची गरज भासणार आहे. वेकोलिच्या या नवीन खाणीद्वारे कोळसा उत्पादन वाढवून या वाढत्या ऊर्जेच्या मागणीसाठी हातभार वेकोलिला लावणे शक्य होणार असल्याचेही द्विवेदी यांनी सांगितले.

कोळसा मंत्रालयाचे नियोजन काय?

कोळसा मंत्रालयाने वर्ष २०२७ पर्यंत १ हजार ४०४ दशलक्ष टन (एमटी) म्हणजेच १४० कोटी टन, तर वर्ष २०३० पर्यंत १ हजार ५७७ दशलक्ष टन (एमटी) म्हणजेच १५७.७ कोटी टन कोळसा उत्पादनासाठी योजना आखली आहे. सध्याच्या घडीला प्रतिवर्षी सुमारे एक अब्ज टन कोळशाचे उत्पादन होत आहे.