एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करणे ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. परंतु, त्यांनी हजारो युवकांना रोजगार मिळण्याची क्षमता असलेला प्रकल्प घालवून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गुरुवारी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘वेदांता-फॉक्सकॉन’ हा विषय राजकारणाचा नाही. हा महाराष्ट्रातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशाल प्रकल्पासाठी उच्चाधिकारी समितीची ९५ वी विशेष बैठक १५ जुलै २०२२ ला झाली होती. त्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार होते.

हा प्रकल्प एक लाख ७५ हजार कोटींचा आहे. राज्यात ६० हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. त्यातून सुमारे एक लाख रोजगार निर्माण होणार होते. उच्चाधिकार समितीने देखील उद्योगाला आवश्यक सोयी-सवलती देण्याची शिफारस मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे केली होती. त्यानंतरही हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला कसा, त्यासाठी ‘वेदांता’च्या अग्रवाल यांच्यावर कोणाचे दडपण होते काय, असा सवालही लोंढे यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकार पाडून भाजपला सत्तेत आणण्यात आले.त्याचे बक्षिस (रिटर्न गिफ्ट) म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकणारा प्रकल्प गुजरातला दिला काय, ही महाराष्ट्राशी गद्दारी नाही काय, असा सवालही लोंढे यांनी केला.

हा प्रकल्प परत आणण्यासाठी प्रयत्न करावे नाहीतर काँग्रेस राज्यात मोठे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Story img Loader