मालवाहू ट्रकवर कारवाई न करण्यासाठी चालकाकडून ५०० रुपयांची लाच घेताना नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या वादग्रस्त मोटर वाहन निरीक्षकासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. अभिजीत सुधीर मांजरे (३९), करण मधुकर काकडे (२८, रामटेक) आणि विनोद महादेवराव लांजेवार (४८, कामगार कॉलनी, सुभाषनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
अभिजीत मांजरे आणि त्याची पत्नी गीता हीसुद्धा आरटीओमध्ये निरीक्षक आहेत. दोघांचाही कारभार वादग्रस्त आहे. अभिजीत हा कांद्री चेक पोस्टवर कार्यारत आहे. ३३ वर्षीय ट्रकचालक बुधवारला मनमाडवरून रिवा येथे जात होता. त्याच्यावर चालान कारवाई केली आणि ५०० रुपये अतिरिक्त मागण्यात आले. त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे, मांजरेच्या उपस्थित त्याला शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे, त्याने ५०० रुपये देऊन सुटका केली. काही अंतरावर गेल्यानंतर ट्रक बंद पडला. मालकाने त्याला ट्रक नागपुरात परत आणण्यास सांगितले. चालकाला पुन्हा प्रवेश देण्यासाठी ५०० रुपये मागण्यात आले. त्याने मालकाला माहिती देऊन एसीबीमध्ये तक्रार केली. पोलिसांनी मांजरेविरुद्ध सापळा रचला आणि ५०० रुपये घेताना विनोद लांजेवार आणि करण काकडे यांना अटक केली.
हेही वाचा – चंद्रपूर : बनावट दारू कारखाना प्रकरणातील आरोपीने घेतले विष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत आणि गीता यांनी तीन शहरांमध्ये काही भूखंड विकत घेतले असून, त्यांच्याकडे ३ ते ४ सदनिका आहेत. गीता शेजवळ या उस्मानाबादमध्ये कार्यरत असताना योग्यता प्रमाणपत्राचा घोळ झाला होता. त्या प्रकरणात गीता यांच्यावर पोलिसांनी गुन्हासुद्धा दाखल केला होता. यात कर्तव्यात कसूर केल्याने वेतनवाढसुद्धा थांबविण्यात आली होती. अभिजीत आणि गीता यांनी वरिष्ठांवर दबाव आणून चांगल्या ठिकाणी पदभार मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चाही होत आहे.
हेही वाचा – चंद्रपुरात होणार राज्यातील एकमेव कृषी तंत्रज्ञान उद्यान
ग्रामीण आरटीओमधील यासह अन्य तपासणी नाक्यांवरही ट्रकचालकांकडून वसुली केल्या जात असल्याचे प्रकार होत असून, त्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची माहिती समोर येत आहे.