नागपूर : कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या वेस्टन कोलफिल्ड लिमिटेडने (वेकोलि) २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६९.१२१ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचा नवीन उच्चांक स्थापित केला. त्यामुळे राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना आंशिक दिलासा मिळाला आहे. वेकोलीच्या कोळसा उत्पादनासह इतर कामगिरीबाबत आपण जाणून गेऊ या.

महाराष्ट्रासह देशात आजही सर्वाधिक वीज निर्मिती औष्णिक वीजनिर्मिती केंद्राद्वारेच केली जाते. येथे वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर कोळशाची गरज असते. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेकदा विदेशातून कोळसा आयात करण्याची पाळी येते. त्यामुळे केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी वेकोलिला उत्पादन वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वेकोलिने २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६९ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले व ६९.१२१ दशलक्ष टन कोळसा उत्पादन करण्यात आले.

वेकोलिने २०२३-२४ या आर्थिक वर्षात, ६८ दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठरवल्यावरही ६९.११ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन घेतले होते. यंदा त्याहून किंचित जास्त उत्पादन झाले. त्यामुळे वीज निर्मिती करणार्या कंपनीला आंशिक दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वेकोलिने खुल्या लिलाव निविदा प्रक्रियेत सहभाग घेऊन नागपूर जिल्ह्यातील दहेगाव मकरधोकडा ४ ही कोळसा खाण मिळवण्यात यश मिळवले. त्यामुळे या पद्धतीने कोल ब्लाॅक मिळवणारी वेकोलि ही कोल इंडियाची पहिली उपकंपनी ठरल्याचे वेकोलिचे अध्यक्ष जे. पी. द्विवेदी यांनी नागपुरात झालेल्या ‘रुबरू’ या कार्यक्रमात सांगितले.

३७०.१४१ दशलक्ष घनमीटर माती काढली

जमिनीतून कोळसा काढताना माती-दगडासह इतरही वस्तू काढाव्या लागतात. २०२४-२५ मध्ये तब्बल ३७०.१४१ दशलक्ष घनमीटर माती- दगडासह इतर वस्तूही काढल्याची माहिती वेकोलिने दिली.

वेकोलीच्या कोणत्या खाणीतून सर्वाधिक उत्पादन ?

वेकोलिने २०२४-२५ मध्ये कामगार, अधिकाऱ्यांच्या बळावर सर्वाधिक ६९.१२१ दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले. एकूण उत्पादनात वेकोलिच्या वणी क्षेत्रातील खाणीतून १५.३५३ दशलक्ष टन, उमरेड खाणीतून १३.१७७ टन, नागपूर प्रदेशच्या खाणीतून ११.३३१ टन कोळसा उत्खनन करण्यात आले, अशी माहिती वेस्टन कोलफिल्ड लिमिटेडचे अध्यक्ष जे. पी. द्विवेदी यांनी दिली. नागपुरात झालेल्या ‘रुबरू’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

वेकोली या कंपणीबाबत…

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) ही कोल इंडिया लिमिटेड (सीआयए) च्या आठ उपकंपनींपैकी एक आहे जी कोळसा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत समाविष्ट केलेल्या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोल इस्टेट, सिव्हिल लाइन्स, नागपूर – ४४०००१ येथे आहे.