अकोला : आकाशात दरमहा प्रत्येक ग्रहाजवळ चंद्र आल्याने युती स्वरूपात ग्रह दर्शन होत असते. यापेक्षाही अधिक आनंद दोन ग्रह एकत्र बघतांना होतो. या प्रकारे शुक्र आणि मंगळ ग्रह २२ फेब्रुवारीला एकमेकांच्या अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व क्षितिजावर अनुभवता येणार आहे. या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद आकाश प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन विश्वभारतीचे केंद्रप्रमुख प्रभाकर दोड यांनी केले.
चंद्र रोज बारा अंश सरकून एका दिवसात एक नक्षत्र आणि एका महिन्यात पूर्ण राशीचक्र फिरतो. जेव्हा चंद्र पुष्य नक्षत्रात येईल आणि जर त्या दिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृत योग जुळतो. याच दिवशी पूर्व आकाशात शुक्र व मंगळ दर्शनाचा अमृत योग घडून येत आहे. पृथ्वीला सर्वात जवळ असलेला आणि सूर्यमालेत सर्वात जास्त तेजस्वी असलेला शुक्र आणि सूर्यमालेत पृथ्वीनंतरचा लालसर रंगाचा मंगळ ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ बघता येतील. या दोन्ही ग्रहांचे स्थान मकर राशीत बाराव्या अंशावर पहाटे ५.२१ वाजता उगवतील. दोन ग्रहांच्या एकत्रित आल्याने पूर्व क्षितिजावरील हा अनोखा आकाश नजारा सकाळी ६ वाजेपर्यंत नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.
हेही वाचा – “पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…
सूर्यमालेत प्रसिद्ध असलेला शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असल्याने याचे उदयास्त पूर्व वा पश्चिम क्षितिजावर होत असतात. मंगळ ग्रहावर लोह खनिज अधिक प्रमाणात असल्याने त्याचा रंग लाल असून आपल्या ‘माउंट एव्हरेस्ट’पेक्षा सुमारे तीन पट उंच असलेले ‘ऑलिंपस्मोन’ हे सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे, अशी माहिती दोड यांनी दिली.