अकोला : सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून शुक्राची ओळख आहे. सध्या पश्चिम आकाशात अधिराज्य गाजवणारा शुक्र ग्रह कधी तारा म्हणून ओळखल्या जात होता. सद्यस्थितीत पृथ्वीच्या जवळ आल्याने त्याची तेजस्विता अधिकाधिक वाढलेली आहे. १४ ते १८ फेब्रुवारीदरम्यान सर्वाधिक तेजस्विता असल्याने शुक्र ग्रह पश्चिम आकाशात अधिक प्रकाशमान दिसणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

शुक्र हा ग्रह पृथ्वी खालोखाल आकाराचा, सूर्यापासून क्रमांक दोनवर आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यात असल्याने या ग्रहाचा उदय व अस्त पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर होतो. याला सायंकालीन किंवा प्रभात कालीन तारा समजून प्राचीन काळी याच्या आकाश स्थितीवरून वेळ सुद्धा ठरवली जात होती. या ग्रहावर ढगांचे आवरण अधिक प्रमाणात असून त्याला बुरख्यातील सुंदरी म्हणून ओळखले जात होते. सुमारे 65 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित होत असल्याने हा एकमेव ग्रह दिवसा, भर दुपारी सूर्य असताना आकाशात दिसू शकतो. अंधाऱ्या रात्री शुक्र प्रकाशात सावल्या सुद्धा पाहता येतात.

सध्या शुक्र ग्रह राशी चक्रातील मीन राशीत असून १९ मार्चला पश्चिम क्षितिजावर त्याचा अस्त होईल. २६ मार्चपासून पुन्हा पहाटे पूर्व क्षितिजावर उदय होणार आहे. सध्या या ग्रहाचे दुर्बिणीतून निरीक्षण केल्यास कृष्ण पंचमीच्या चंद्राप्रमाणे त्याच्या कलांचे मनमोहक दर्शन होत आहे. या महिन्याच्या शेवटी तर चतुर्थी शुक्रकोर फारच विरोभनीय दिसेल. २१ मार्च विषुवदिनी या शुक्र ग्रहाची अमावस्याची स्थिती असेल. शुक्र ग्रहाचा दिवस वर्षापेक्षा मोठा असून पृथ्वीच्या तुलनेत शुक्रावरील दिवस हा २४३ दिवसाचा असतो. या ग्रहावर नेहमी आम्ल पाऊस पडत असून हा पाऊस जमिनीवर वाहत न जाता उष्णतेने पुन्हा बाष्पीभवन होऊन खाली वर होत राहतो, असे प्रभाकर दोड म्हणाले. हा एक आगळावेगळा ग्रह आपल्याला सध्या अतिशय चांगल्यापैकी दर्शनास सज्ज आहे. या खगोलीय घटनेचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

१३० वर्षात दोनदा सूर्य बिंबावरून अधिक्रमित

शुक्र अंतर्ग्रह असल्यामुळे १३० वर्षात दोनदा सूर्य बिंबावरून अधिक्रमित होत असतो. या अगोदर २००४ आणि २०१२ यावर्षी शुक्र अधिक्रमण अनेक लोकांच्या स्मरणात असेल. यानंतर अशी स्थिती ९२ वर्षानंतर २११७ यावर्षी येईल, अशी माहिती प्रभाकर दोड यांनी दिली

Story img Loader