भंडारा: निवडणूक झाल्यानंतर कित्येक लाडक्या बहिणी “दोडक्या” होत आहेत. सात महिने योजनेचा लाभ घेतल्यानंतर कधी कुणाचा पत्ता कट होईल याचा नेम नाही. नियमात बसतील त्यांनाच यापुढे योजनेचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे. काही प्रामाणिक बहिणींनी यातून माघारही घेतली. जिल्ह्यातही अशा बहिणी आहेत. आता शासनाकडून प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी सुरू झाली असून ५०० लाडक्या बहिणींची यादी संबंधित विभागाकडून सध्या तपासली जात असल्याचे समजते.
माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ९७१ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिलांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली असता साधारणतः १६४७ महिलांचे अर्ज यापूर्वीच बाद ठरले आहेत. कागदपत्रांत चुकीचा आधार क्रमांक, पुसट प्रत, स्वाक्षरी न जुळणे, अर्जदार एक-आधार दुसऱ्याचे अशा काही मानवी त्रुटी असू शकतात, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. अर्ज भरलेल्या बहुतांश महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या ठरल्या. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्यांना पंधराशे रुपये प्रमाणे पैसेही मिळाले. मात्र आता या पात्र ठरलेल्या बहिणींपैकी किती बहिणी खऱ्या अर्थाने शासनाच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात हा प्रश्नच आहे.
कारण आता शासनाने जे नियम ठरवून दिले आहेत त्याप्रमाणे अर्ज असलेल्या बहिणींना भविष्यात लाभ देण्याचे स्पष्ट केले आहे. निकषात न बसणाऱ्या बहिणीही सरकारच्या लाडक्या ठरल्या. मात्र आता अशा बहिणींचा पत्ता कट होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी स्वतःहून या योजनेतून अनेक महिला माघार घेताना दिसत आहेत. भंडारा जिल्ह्यात २० च्या आसपास महिलांनी या योजनेतून माघार घेण्यासाठी अर्ज केला. तर दुसरीकडे शासनाकडून कागदपत्र पडताळणीचे काम सुरू झाले असून महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे ५०० लाडक्या बहिणींची यादी शासनाकडून आली. ती तपासणीचे काम सुरू आहे.
योजनेचे निकष ठरवून दिल्याप्रमाणे कागदपत्र जोडली असतील तर त्या बहिणी पात्र ठरतील. त्यावर ज्यांच्याकडे चार चाकी किंवा आयकर भरणा केला जात असेल अशा बहिणींच्या तपासणीच्या दृष्टीनेही शासनाकडून संबंधित विभागाच्या मार्फत माहिती संकलन करून पात्र अपात्रतेच्या निकशात या बहिणींना बसविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता अनेक बहिणींची धाकधूक वाढली असून असे झाल्यास महिन्याकाठी मिळणारे पंधराशे रुपये बंद होतील, याची खंत त्यांना नक्कीच असेल.
तपासणीचे काम सुरू: पवनीकर
शासनाकडून ५०० लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली. योजनेचा अर्ज भरताना त्यांनी अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीचे काम सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांनी दिली.