नागपूर : मराठी माणूस स्वत:ला सुसंस्कृत म्हणवतो. पण, त्याचा या सुसंस्कृततेशी खरेच संबंध आहे का, असा भेदक प्रश्न ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी गुरुवारी उपस्थित केला. मला तरी हा संबंध दूरदूपर्यंत दिसून येत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या ‘कलेतील भारतीयत्वाची चळवळ-द बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ आणि ‘नियतीचा विलक्षण खेळ-नगरकर, चिमूलकर, आलमेलकर’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळय़ात प्रा. एलकुंचवार बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी संस्कृतीपासून दूर चाललेल्या मराठी माणसांबाबत परखड भाष्य केले. ‘‘कला, इतिहासाबाबत आपण अनभिज्ञ असतो. हे सांस्कृतिक सुमारीकरण नव्हे, तर भिकारीकरण आहे’’, असे एलकुंचवार म्हणाले.

‘‘अभिजाततेपासून आपण आणखी दूर गेलो आहोत. नव्या पिढीला कलेच्या इतिहासाबद्दल माहिती नाही. पण, त्यास ही पिढीच नव्हे, तर त्यांचे पालकही तेवढेच जबाबदार आहेत. एकीकडे पाश्चात्य देशातील नागरिक आपल्या पाल्याचे बोट पकडून त्याला संस्कृतीची ओळख करून देत असताना भारतात मात्र हे चित्र कधी दिसून येत नाही’’, याकडे एलकुंचवार यांनी लक्ष वेधले. सुसंस्कृत नागरिक तयार करायचा असेल तर घर आणि शाळा या दोन्ही ठिकाणांहून त्याच्यावर कलेचे संस्कार व्हायला हवेत, असे प्रा. एलकुंचवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran dramatist el kunchwar question is whether marathi people are really related to civilization amy
Show comments